रिपब्लिकन घोषणा दिवसाचा समारंभ
‘विखुरले म्हणून रिपब्लिकन चळवळ थांबणार नाही’
हक्कांसाठी संघर्षाची मशाल पेटती ठेवा - सतीश पेंदाम
शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )
चिमूर : - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या घोषणेला ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ३० सप्टेंबर रोजी चिमूर येथील शेतकरी भवनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया घोषणा दिवस समारंभ उत्साहात पार पडला. रिपब्लिकन विचारधारा, संविधान आणि सामाजिक हक्कांच्या मुद्द्यांवर झालेल्या या कार्यक्रमाला चिमूरसह ब्रह्मपुरी, आरमोरी, वरोरा, भद्रावती आणि चंद्रपूर परिसरातील हजारो महिला-पुरुष उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिक्खू ज्ञानज्योती महाथेरो होते. प्रमुख अतिथी म्हणून निलेश कराळे (वर्धा), तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष इंजि. सतीश पेंदाम उपस्थित होते. डॉ. अनमोल शेंडे, डेविड शेंडे, परमानंद रामटेके, अर्चना सुखदेवे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना इंजि. सतीश पेंदाम यांनी रिपब्लिकन विचारधारेच्या ऐतिहासिक वाटचालीवर प्रकाश टाकला. “रिपब्लिकन हा शब्द गौतम बुद्धांच्या गणराज्याच्या संकल्पनेतून आला आहे. गणतंत्र म्हणजे नागरिकांचे अधिकार आणि त्यांची भूमिका. जो समाज आंदोलित राहतो, तोच समाज जिवंत राहतो,” असे त्यांनी सांगितले.
रिपब्लिकन चळवळीतील विभाजनाचा उल्लेख करताना पेंदाम यांनी विखुरलेल्या प्रवृत्तींमुळे आंदोलनाचे तुकडे झाल्याचे सांगितले. समाजाने आपल्या हक्कांसाठी सातत्याने संघर्षशील राहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धांच्या विचारांनी प्रेरित होते. १९३६ मध्ये त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. त्यानंतर शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून राजकीय लढा पुढे नेला. ३० सप्टेंबर १९५६ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची घोषणा करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला, अशी माहिती पेंदाम यांनी दिली.
आदिवासींना ‘वनवासी’ संबोधण्यास पेंदाम यांनी आक्षेप घेतला. संविधानामुळेच नागरिकांचे हक्क सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
निलेश कराळे यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन केले. समाजकल्याणाचे निर्णय घेण्यासाठी बहुजन समाजातील तरुणांनी सत्ताकेंद्रात पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अनमोल शेंडे यांनी बहुजन समाजातील सर्व गटांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. रिपब्लिकन विचारातून मिळालेली दिशा पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय मार्गदर्शनात भिक्खू ज्ञानज्योती महाथेरो यांनी धम्मकार्याबरोबरच सामाजिक जागृतीवर भर देण्याचे आवाहन केले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन विचारांची जाणीव ठेवून समाजाने आपली राजकीय शक्ती निर्माण करावी, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन भन्ते डॉ. धम्मचेती यांनी केले, तर वर्षा शामकुळे यांनी आभार मानले. चिमूरसह विविध तालुक्यांतून आलेल्या हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप झाला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!