ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला पुन्हा सेवेत घ्या; अन्यथा जिल्हाभर आंदोलन
पारडी ग्रामपंचायतीतील कारवाई विरोधात लोहार समाज आक्रमक
उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील पारडी येथील गटग्रामपंचायतीअंतर्गत कार्यरत पाणीपुरवठा कर्मचारी राजेंद्र दाभेकर यांच्यावर करण्यात आलेली सेवेतून हकालपट्टीची कारवाई मागे घेऊन त्यांना तातडीने पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे, तसेच संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा लोहार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत दाभेकर यांना सेवेत रुजू करून योग्य ती कारवाई न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लोहार समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यासंदर्भात चंद्रपूर जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी चंद्रपूर जिल्हा लोहार समाजाचे अध्यक्ष आनंद बावणे यांच्यासह समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पारडी गटग्रामपंचायतीअंतर्गत पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत श्रीकृष्ण तुरारे आणि राजेंद्र दाभेकर यांना सन २०२२ पासून ग्रामपंचायतीकडून देय असलेले २५ टक्के वेतन व ५० टक्के भत्ता मिळाला नसल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्यांनी केला होता. सदर रक्कम संबंधित ग्रामसेवकाकडून देण्यात आली नसून परस्पर वळविण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही अपेक्षित न्याय मिळत नसल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने १६ डिसेंबर रोजी संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. संबंधित कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीसमोर कुटुंबासह उपोषण करण्याचा इशाराही दिला होता.
त्यानंतर विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याबरोबरच संबंधित कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम संबंधित ग्रामसेवकाकडून वसूल करून कर्मचाऱ्यांना देण्याबाबत निर्देश दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मात्र, अनेक दिवस उलटूनही संबंधित रक्कम मिळाली नसल्याने राजेंद्र दाभेकर यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पारडी ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक, सरपंच व काही सदस्यांनी दाभेकर यांच्यावर कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांना पाणीपुरवठा कर्मचारी पदावरून कमी केल्याचा आरोप लोहार समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
दाभेकर यांनी या कारवाईला आक्षेप घेत ती अन्यायकारक व चुकीची असल्याचे सांगत जिल्हा परिषद प्रशासनाकडे दाद मागितली आहे.
या निवेदनामुळे पारडी ग्रामपंचायतीतील कर्मचारी प्रकरणाला आता सामाजिक संघटनेच्या आंदोलनाची दिशा मिळाली असून, प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
आठ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दाभेकर यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे, तसेच त्यांच्या तक्रारीनंतर झालेल्या कारवाईची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी लोहार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
संबंधित कर्मचाऱ्यावर अन्याय झाल्यास लोहार समाज शांत बसणार नाही. प्रशासनाने येत्या आठ दिवसांत दाभेकर यांना सेवेत रुजू करून या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी. अन्यथा चंद्रपूर जिल्ह्यातील लोहार समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा लोहार समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!