सावरी (बीड) येथे तहकूब ग्रामसभा उत्साहात संपन्न
तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी दिवाकर डाहुले यांची एकमताने निवड
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्हातंर्गत येत असलेल्या चिमूर तालुक्यातील मौजा सावरी (बीड) येथे महिला व पुरुषांची तहकूब ग्रामसभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या ग्रामसभेत गावाच्या सामाजिक सलोख्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी दिवाकर नाथुजी डाहुले यांची एकमताने निवड करण्यात आली.
तसेच समितीच्या उपाध्यक्षपदी रमेश वाकळे,तर सचिवपदी लोकेश खामनकर यांची निवड करण्यात आली.उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या ग्रामसभेला ग्रामपंचायत सरपंच लोकनाथ रामटेके, ग्रामसेवक निखिल सहारे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप मोटघरे,ग्रामपंचायत सदस्या सुरेखा शेंबेकर,किरण मेश्राम,नलू सेबळे,आशिष घाणोडे,संगणक परिचालक सुरेश मेश्राम तसेच रोजगार सेवक बुद्धरत्न शेंडे यांच्यासह गावातील महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसभेत गावाच्या विकासासह सामाजिक एकोपा,शांतता आणि गावातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून गावातील छोटे-मोठे वाद सामंजस्याने सोडवून सावरी (बीड) गावात शांतता व बंधुभाव कायम ठेवण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
एकमताने झालेली ही निवड गावातील एकजुटीचे आणि सामाजिक सलोख्याचे उत्तम उदाहरण ठरत असून,नवनियुक्त तंटामुक्ती समितीकडून गावाच्या हितासाठी प्रभावी कामगिरी होईल,असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!