ओटीपी आला; सिलेंडर नाही! मूलच्या गॅस वितरणावर प्रश्नचिन्ह; सिलेंडरच्या काळाबाजाराचा संशय
मूलमध्ये गॅस टंचाईने ग्राहक त्रस्त; वितरण व्यवस्थेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह
ओटीपी मिळूनही सिलेंडर न मिळाल्याच्या तक्रारी; काळाबाजाराच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी
मूल | प्रतिनिधी
मूल शहरात घरगुती गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत ग्राहकांच्या अडचणी वाढत असून, बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. दरम्यान, काही ग्राहकांनी गॅस कनेक्शन नसलेल्या व्यक्तींना जादा दराने सिलेंडर विकले जात असल्याचा आरोप केला असून, या तक्रारींची संबंधित विभागाने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर ग्राहकांच्या मोबाईलवर ओटीपी प्राप्त होतो. मात्र, ओटीपी मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष सिलेंडर मिळाला नसल्याच्या तक्रारी काही ग्राहकांनी केल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये ग्राहकांनी सिलेंडर घेतला नसतानाही त्यांच्या नावावर डिलिव्हरी झाल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे वितरण नोंदी आणि प्रत्यक्ष ग्राहक यांची पडताळणी करण्याची मागणी पुढे आली आहे.
या प्रकारामुळे ग्राहकांच्या नावावर नोंद झालेला सिलेंडर प्रत्यक्षात कुठे जातो, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. काही नागरिकांनी सिलेंडर काळ्या बाजारात वळविला जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, संबंधित विभागाकडून चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
पूर्वीच्या घटनेमुळे पुन्हा चर्चेत
संबंधित एजन्सीबाबत यापूर्वीही गॅसच्या हाताळणीशी संबंधित एक गंभीर घटना घडल्याची माहिती नागरिकांकडून दिली जात आहे. गॅस चोरीच्या संशयासंदर्भात कारवाईदरम्यान स्फोट झाल्यानंतर काही काळ एजन्सीचा पुरवठा बंद करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर पुन्हा पुरवठा सुरू करण्यात आला.
आता पुन्हा वितरणाबाबत तक्रारी समोर आल्याने संबंधित एजन्सीच्या कामकाजाची आणि गॅस वितरण प्रक्रियेची प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
बुकिंगच्या कालावधीवरही प्रश्न
गॅस सिलेंडरच्या बुकिंगसाठी असलेली ४५ दिवसांची मर्यादा कमी करून २५ दिवसांवर आणावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष रावत आणि भाजपाचे नेते मोतीलाल टहलीयानी यांनी यापूर्वी केली होती.
ग्राहकांना वेळेवर सिलेंडर उपलब्ध व्हावा आणि टंचाईच्या काळात वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक राहावी, यासाठी बुकिंग आणि वितरणाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
प्रशांत गट्टूवारांकडूनही मुद्दा उपस्थित
शिवसेनेचे प्रशांत गट्टूवार यांनी समाजमाध्यमातून ओटीपी प्राप्त झाल्यानंतरही ग्राहकाला सिलेंडर मिळाला नसताना त्याच्या नावावर वितरण झाल्याचा दावा करणारी बाब मांडली आहे. या संदर्भात अन्याय झालेल्या ग्राहकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबतही तक्रारी
दरम्यान, एजन्सीमध्ये माहिती घेण्यासाठी जाणाऱ्या ग्राहकांना पुरेशी माहिती दिली जात नसल्याच्या तसेच काही कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची भाषा केली जात असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत. या तक्रारींचीही प्रशासनाने दखल घेऊन ग्राहकांना योग्य माहिती व सेवा मिळत आहे की नाही, याची पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.
‘ओटीपी ते डिलिव्हरी’ नोंदी तपासण्याची मागणी
गॅस वितरणाबाबतच्या तक्रारींची वस्तुनिष्ठ पडताळणी करण्यासाठी बुकिंग, ओटीपी, डिलिव्हरी नोंद, ग्राहकाची प्रत्यक्ष प्राप्ती आणि एजन्सीतील स्टॉक यांची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ग्राहकाच्या नावावर सिलेंडर वितरित झाल्याची नोंद असेल, तर तो सिलेंडर प्रत्यक्षात ग्राहकापर्यंत पोहोचला का? या प्रश्नाचे उत्तर पारदर्शकपणे मिळणे आवश्यक आहे. संबंधित विभागाने तक्रारींची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट केल्यास ग्राहकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर होण्यास मदत होईल.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!