लांडग्यांच्या हल्ल्यात ९ मेंढ्या ठार - मेंढपाळाचे लाखोचे नुकसान @ मेंढपाळात भीतीचे वातावरण
सावली - सावली वनपरिक्षेत्रातील शेतशिवारात गेल्या वर्षभरापासून लांडग्यांचा कळप सक्रिय असल्याचे सांगण्यात येत असून, आकापूर शेतशिवारात चरत असलेल्या मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांनी हल्ला करून तब्बल ९ मेंढ्या ठार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, या घटनेमुळे मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने लांडग्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मेंढपाळांकडून होत आहे.
पारंपारिक व्यवसाय संकटात
सावली तालुक्यातील खेडी, चांदली बुज. यासह परिसरातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मेंढपाळ असून, शेळ्या-मेंढ्या पाळणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. जंगल परिसरात वाघ व बिबट्यांची भीती असल्याने मेंढपाळ शेतशिवारातील पडीक जागांवर मेंढ्यांना चराईसाठी घेऊन जातात. मात्र, सावली, खेडी, चांदली, आकापूर आणि कवठी परिसरात १० ते १२ लांडग्यांचा कळप सक्रिय असल्याचे मेंढपाळांचे म्हणणे आहे. या लांडग्यांकडून शेळ्या-मेंढ्यांवर हल्ले होत असल्याने मेंढपाळांचा व्यवसाय धोक्यात आला आहे.
अचानक हल्ला; ९ मेंढ्या ठार
आकापूर शेतशिवारात चांदली बुज. येथील मेंढपाळ गोपाल देवराव मुद्रीवार यांचा मेंढ्यांचा कळप चरत असताना अचानक लांडग्यांच्या कळपाने हल्ला चढविला. या हल्ल्यात ९ मेंढ्या ठार झाल्याने मुद्रीवार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे मेंढपाळांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, चराईसाठी मेंढ्या घेऊन जाणेही धोकादायक ठरत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात
लांडग्यांच्या वाढत्या वावरामुळे मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने या परिसराची पाहणी करून लांडग्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवावे. तसेच, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि नुकसानग्रस्त मेंढपाळाला शासकीय नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!