माकडाचा पाठलाग करताना बिबट्या विजेच्या खांबावर चढला; विजेचा जोरदार धक्का बसून दोघांचाही दुर्दैवी मृत्यू
प्रतिनिधी - शुभम बारसागडे
चिमूर / नेरी : - शिकाराच्या शोधात असलेल्या एका मादी बिबट्याला माकडाचा पाठलाग करणे भलतेच महागात पडले. माकडाच्या मागे धावताना विजेच्या 'डीपी'वर चढल्याने विजेचा तीव्र धक्का लागून मादी बिबट्यासह माकडाचाही जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. चिमूर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या शंकरपूर उपवनक्षेत्रातील वगाडपेठ शिवारात सोमवारी सकाळी ही घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव येथील शेतकरी महादेव धारणे यांच्या शेतात विजेची डीपी आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास या डीपीवर एक माकड बसले होते. त्याचा पाठलाग करत मादी बिबट्याही विजेच्या डीपीवर चढली. या दरम्यान विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागल्याने दोघांचाही जागीच तडफडून मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.
सोमवारी सकाळी शेतकरी महादेव धारणे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले असता, त्यांना डीपीजवळ बिबट्या आणि माकड मृत अवस्थेत पडून असल्याचे दिसले. त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला दिली.
वनविभागाकडून पंचनामा व अंत्यसंस्कार
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, मानद वन्यजीव रक्षक आमोद गौरकर, वनपाल राजेंद्र मेश्राम, वनरक्षक कालिदास गायकवाड व वनमजुरांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.
त्यानंतर दोन्ही मृत प्राण्यांचे शव खडसंगी येथील वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. येथे ब्रह्मपुरीचे उपवनसंरक्षक डॉ. कुमार स्वामी, सहायक उपवनसंरक्षक महेश गायकवाड, मानद वन्यजीव रक्षक आमोद गौरकर, पशुवैद्यकीय सहाय्यक आयुक्त डॉ. रमेश कुमार ओव्हाळ, शंकरपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील व चैतन्य सोनुले यांच्या उपस्थितीत दोन्ही प्राण्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समक्ष रीतसर दहन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!