धान बोनससह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नागभीडला आज ‘ट्रॅक्टर मोर्चा’
तळोधी (बा.) ते नागभीड तहसील कार्यालयावर धडकणार मोर्चा; गावागावांतून हजारो शेतकरी सहभागी होणार
तळोधी (बा.) ;-
Bधान उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी तसेच धान बोनससह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता तळोधी (बा.) येथील साई मंदिर देवस्थानातून नागभीड तहसील कार्यालयावर भव्य ‘ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्यात येणार आहे. तालुक्यातील गावागावांत मोर्चाबाबत जनजागृती करण्यात आली असून मोठ्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टरसह या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा बोनस तातडीने जाहीर करून त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, धानाला किमान ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळावा, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यात यावी, या प्रमुख मागण्या मोर्चाच्या माध्यमातून शासनासमोर मांडण्यात येणार आहेत. धान उत्पादनाचा वाढता खर्च, मजुरी, खते, औषधे, बियाणे आणि इतर शेती निविष्ठांच्या वाढलेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य मोबदला मिळावा, अशी मागणीही करण्यात येणार आहे.
शेतीसाठी २४ तास सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, खते, बियाणे व कृषी औषधांच्या दरांवर नियंत्रण ठेवून ती शेतकऱ्यांना योग्य दरात उपलब्ध करून द्यावीत, महाडीबीटीच्या माध्यमातून ५० टक्के अनुदानावर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी आहे. शेती व लागवडीसाठी आवश्यक आर्थिक मदत आणि विविध योजनांचे अनुदान वेळेत उपलब्ध करून द्यावे, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.
धान उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार नवीन विद्युत कनेक्शन उपलब्ध करून द्यावे, कर्जमाफी योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करून पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्यावा, तसेच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचे रखडलेले हप्ते नियमितपणे वितरित करावेत, अशी मागणीही करण्यात येणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आवश्यक सिंचन सुविधा विनाविलंब उपलब्ध करून देऊन शेतीला कायमस्वरूपी पाण्याची सोय निर्माण करण्याची मागणीही आंदोलनातून केली जाणार आहे.
धान शेतीवर अवलंबून असलेल्या हजारो शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. अनेक मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित असून त्यावर ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी या मोर्चातून केली जाणार आहे.
दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक तथा शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या उपस्थितीत हा मोर्चा नागभीड तहसील कार्यालयावर धडकणार आहे. मात्र या आंदोलनाचे नेतृत्व कोणत्याही एका व्यक्तीचे नसून सर्व शेतकरी एकजुटीने या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत, अशी भूमिका आयोजकांनी स्पष्ट केली आहे. हा मोर्चा केवळ एका मागणीपुरता मर्यादित नसून धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणारा सामूहिक आवाज असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या आंदोलनात शेतकरी बाळू कामडी, अतुल सिद्धमशेट्टीवार, आतिष भाकरे, भूपेश भाकरे, विलास घोनमोडे यांच्यासह तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधव सहभागी होणार आहेत. तसेच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तुकाराम निकुरे, उपाध्यक्ष रमेश बोरकर, सचिव धनंजय बोरकर, विनोद बोरकर, संजय गहाणे, कृष्णा गंजेवार, गिरीश नवघडे, दिवाकर कामडी, विश्वनाथ बोरकर, खोजराम मरसकोल्हे, आनंदराव शेंडे यांच्यासह अनेक शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार आहेत.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील गावागावांत शेतकऱ्यांशी संपर्क साधून जनजागृती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्नांसाठी एकत्र येऊन मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तळोधी (बा.) येथील साई मंदिर देवस्थानातून सकाळी १० वाजता सुरू होणारा हा ट्रॅक्टर मोर्चा नागभीड तहसील कार्यालयावर धडकणार असून, तेथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात येणार आहे.
“आमची उपेक्षा हिच आमची ताकद; चला संघटित व्हा! आपल्या हक्कांसाठी नागभीड तहसील कार्यालयावर धडक मारूया!” असा निर्धार व्यक्त करीत शेतकऱ्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धान बोनससह शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर शासनाने सकारात्मक आणि ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने ट्रॅक्टरसह नागभीड येथील मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
-----------------------------
नागभिड तालुक्यातील गावागावांत मोर्चाबाबत होम टू होम जाऊन जनजागृती करण्यात आली असून शेतकऱ्यांमध्ये या आंदोलनाबाबत उत्साहाचे वातावरण आहे. या मोर्चात कोणत्याही दबावाशिवाय स्वयंप्रेरणेने महिला शेतकरी तसेच पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. विशेषतः महिला शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती या मोर्चाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरणार आहे. आपल्या कुटुंबाचा आणि शेतीचा आर्थिक गाडा सांभाळणाऱ्या महिला शेतकरीही आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी या आंदोलनात सहभागी होऊन शासनाचे लक्ष वेधणार आहेत.
“आमची उपेक्षा हिच आमची ताकद; चला संघटित व्हा! आपल्या हक्कांसाठी नागभीड तहसील कार्यालयावर धडक मारूया!” असा निर्धार व्यक्त करीत शेतकऱ्यांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तळोधी (बा.) येथील साई मंदिर देवस्थानातून गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या ट्रॅक्टर मोर्चात महिला व पुरुष शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने, स्वयंप्रेरणेने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!