पट्टेदार वाघाचा बैल चराई करणाऱ्या इसमावर हल्ला

नवतळा शेतशिवारातील थरारक घटना; इसम गंभीर जखमी, वनविभागाची तातडीने घटनास्थळी धाव

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नवतळा येथील शेतशिवारात बैल चराई करण्यासाठी गेलेल्या इसमावर दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक हल्ला केल्याची थरारक घटना दि. १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ४ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात शुभम वसंता शिवरकर (वय ३५), रा. नवतळा हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम शिवरकर हे नेहमीप्रमाणे शेतशिवारात बैल चराई करण्यासाठी गेले होते. यावेळी परिसरात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. वाघाच्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी शिवरकर यांनी आरडाओरड केल्याने तसेच घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली.

घटनेची माहिती मिळताच नवतळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच महादेव कोकोडे यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार बंटी भांगडिया यांनी स्वतः वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून संपर्क साधत वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचावे, अशा सूचना केल्या.
यानंतर वनविभागाचे शंकरपूर येथील राऊंड ऑफिसर मेश्राम तसेच वनरक्षक गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करून जखमी शुभम शिवरकर यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे दाखल केले.
दरम्यान, नवतळा परिसरात वाघाचा वावर असल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतशिवारात गुरे चराई करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वनविभागाने परिसरात गस्त वाढवून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

या घटनेनंतर वनविभागाकडून परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी एकट्याने जंगलालगतच्या किंवा निर्जन शेतशिवारात जाणे टाळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!