सरकार कोणाचेही असो, न्याय मिळेपर्यंत माघार नाही!’ ‘शेतकरी एकता जिंदाबाद’च्या घोषणांनी साई मंदिर परिसर दुमदुमला
तळोधी (बा.) :
धानाच्या बोनसच्या प्रश्नावर नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांचा संताप आता उफाळून आला असून, आपल्या हक्कासाठी आरपारच्या लढ्याची तयारी सुरू झाली आहे. शासनाने हिवाळी अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप बोनसची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि असंतोषाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर नागभीड तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी नागभीड तहसील कार्यालयावर ट्रॅक्टरने विराट मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी ५ सप्टेंबर रोजी तळोधी (बा.) येथील साई मंदिर देवस्थान परिसरात शेतकऱ्यांची विशेष बैठक पार पडली.
शेतीचा हंगाम सुरू असतानाही बैठकीला शेतकऱ्यांनी लक्षणीय उपस्थिती दर्शविल्याने धानाच्या बोनसच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या मनातील असंतोष किती तीव्र आहे, याची प्रचिती आली. बैठकीत शेतकऱ्यांनी ‘शेतकरी एकता जिंदाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
विशेष म्हणजे, ‘सरकार कोणाचेही असो, शेतकऱ्यांच्या हक्काचा न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही,’ अशी ठाम भूमिका बैठकीत शेतकऱ्यांनी घेतली. पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यामुळे ५ सप्टेंबरची बैठक ही केवळ मोर्चाच्या पूर्वतयारीची बैठक न राहता शेतकऱ्यांच्या वाढत्या असंतोषाचे आणि एकजुटीचे दर्शन घडविणारी ठरली.
नागभीड तालुका हा चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख धान उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो. हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक गणित धानाच्या उत्पादनावर अवलंबून आहे. मात्र, बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी, डिझेल तसेच अन्य कृषी निविष्ठांच्या वाढत्या दरामुळे उत्पादन खर्च सातत्याने वाढत आहे. त्यातच शासनाकडून आश्वासन देण्यात आलेला बोनस अद्याप मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिकच तीव्र झाली आहे.
बैठकीत धानाच्या बोनससह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकरी संघटना अधिक बळकट करून लोकशाही मार्गाने शासनाविरोधात संघर्ष उभारण्याचा निर्धार करण्यात आला. १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता तळोधी (बा.) येथील साई मंदिर देवस्थान परिसरातून ट्रॅक्टरच्या माध्यमातून नागभीड तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी तुकाराम निकुरे, आतिष भाकरे, अमोल भाकरे, दिवाकर निकुरे, विनोद बोरकर, डी. के. बोरकर, हेमंत लाजेवार, खोजराम मरस्कोल्हे, रमेश बोरकर, रुपचंद झोडे, व्यंका भाकरे आदी मान्यवरांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
धानाचा बोनस हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि हक्काचा प्रश्न असून, शासनाने आश्वासनाची पूर्तता करून बोनसची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बोनस मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून, १७ सप्टेंबरच्या विराट मोर्चातून नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांची एकजूट आणि संताप शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!