नांदेड हत्याकांडाची निष्पक्ष तपासासाठी SIT व MCOCA अंतर्गत चौकशीची ऑल सिख सिकलीगर असोसिएशन आसा भारत तर्फे तहसीलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना निवेदनातून केली मागणी
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - नांदेड येथील दूध डेअरी परिसरातील धनेगाव पेट्रोल पंपाजवळ ८ ऑगस्ट २०२६ रोजी इंद्रजीतसिंग बलजीतसिंग बावरी यांच्या झालेल्या हत्येच्या प्रकरणाची निष्पक्ष, स्वतंत्र व पारदर्शक चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) गठित करावे, अशी मागणी ऑल सिख-सिकलीगार असोसिएशन (ASA) भारतच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
याबाबत १४ ऑगस्ट २०२६ रोजी निवेदन सादर करण्यात आले असून, ते चिमूर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री तथा राज्याच्या गृहमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, नांदेड दूध डेअरी परिसरातील धनेगाव पेट्रोल पंपाजवळ इंद्रजीतसिंग बलजीतसिंग बावरी यांची हत्या झाल्याचे प्रकरण अत्यंत गंभीर व संवेदनशील आहे. या प्रकरणातील सध्याच्या तपासाचा आढावा घेऊन स्वतंत्र विशेष तपास पथकाच्या माध्यमातून सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
मृत व्यक्तीचे कुटुंबीय व संबंधित व्यक्तींना तपासातील काही महत्त्वाचे पैलू, पुरावे तसेच संबंधित व्यक्तींची योग्य पद्धतीने चौकशी झाली आहे का, याबाबत शंका असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सत्य परिस्थिती व वास्तविक तथ्ये समोर आणण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांचे स्वतंत्र SIT पथक गठित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
CCTV फुटेजच्या आधारे सुमारे नऊ व्यक्तींचा सहभाग असल्याचा दावा
निवेदनात CCTV फुटेजचा संदर्भ देत, घटनेत सुमारे नऊ व्यक्ती सहभागी असल्याचे दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती चारही बाजूंनी निगराणी ठेवत असल्याचेही निदर्शनास येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच या गुन्ह्यात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे संघटनेने म्हटले आहे.
निवेदनात K.B. गँग नांदेड जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचा दावा करण्यात आला आहे. या गँगविरुद्ध हत्या, लूटमार यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले असून, संबंधित आरोपी विविध कारणांमुळे लवकर जामिनावर मुक्त होत असल्याची बाबही निदर्शनास आणून देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांच्या तपासाबाबत मृतकाच्या कुटुंबीयांच्या मनात शंका निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे वरिष्ठ व स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत तपास करण्याची आवश्यकता असल्याची मागणी करण्यात आली आहे.
SIT मार्फत स्वतंत्र तपासाची मागणी
या गंभीर प्रकरणाची निष्पक्षता कायम ठेवण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) गठित करून स्वतंत्र, पारदर्शक व सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच निवेदनात MCOCA अंतर्गत आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
मृतकाच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी आणि स्वतंत्र तपास पथक गठित करण्याचे आदेश द्यावेत, अशी अपेक्षा ऑल सिख-सिकलीगार असोसिएशनने व्यक्त केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!