वाळू माफिया, दलाल आणि पोलिसांमधील कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची चौकशी पूर्ण; अहवाल पोलीस अधीक्षकांकडे सादर

चौकशीअंती कोणावर कारवाई होणार? जनतेचे लक्ष चंद्रपूर पोलीस प्रशासनाकडे

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या वाळू माफिया, कथित दलाल आणि पोलिसांमधील आर्थिक व्यवहारासंदर्भातील ऑडिओ क्लिप प्रकरणाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर, ब्रम्हपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली याचा संपूर्ण तपास आणि चौकशी करण्यात आली असून, चौकशी पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

वाळू तस्करी, वाळू माफिया, त्यांच्यामध्ये मध्यस्थी करणारे कथित दलाल तसेच काही पोलीस कर्मचारी यांच्यातील संभाषण असल्याचा दावा करण्यात येत असलेल्या ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्या होत्या. या ऑडिओ क्लिपमध्ये आर्थिक व्यवहार आणि परस्पर संपर्काबाबत गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विविध स्तरांतून करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर संबंधित ऑडिओ क्लिप, त्यातील संभाषणाचे स्वरूप, त्यामध्ये उल्लेख झालेल्या व्यक्ती, कथित आर्थिक व्यवहार तसेच संबंधित बाबींची चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. चौकशीदरम्यान उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे संपूर्ण चौकशी अहवाल तयार करण्यात आला असून हा अहवाल चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी यांच्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांनी दिली आहे.

दरम्यान, चौकशी अहवाल पोलीस अधीक्षकांकडे सादर झाल्यानंतर आता पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चौकशीमध्ये नेमके काय निष्पन्न झाले? ऑडिओ क्लिपमधील आरोपांना कितपत तथ्य आढळले? कथित आर्थिक व्यवहाराबाबत कोणते पुरावे समोर आले? तसेच या प्रकरणात कोणाची भूमिका संशयास्पद आढळली आहे का, याबाबत अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा आहे.

विशेष म्हणजे, वाळू तस्करीविरोधात प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जात असतानाच वाळू माफिया आणि पोलिसांमधील कथित संबंधांबाबत ऑडिओ क्लिप समोर येणे ही गंभीर बाब मानली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होऊन दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर निलंबणाची कारवाई व्हावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.

चौकशीचा अहवाल आता पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी यांच्या स्तरावर असल्याने त्यानंतर कोणते निर्णय घेतले जातात, याकडे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर-ब्रह्मपुरी परिसरातील नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच वाळू तस्करीविरोधात आवाज उठविणाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

चौकशीअंती कोणा - कोणावर गुन्हे दाखल होणार, कोणावर विभागीय कारवाई होणार किंवा प्रकरणात कोणताही दोष आढळला नाही असा निष्कर्ष निघणार? याचे उत्तर पोलीस प्रशासनाच्या पुढील निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, संबंधित व्यक्तींवरील आरोप हे चौकशी व अधिकृत तपासाच्या अंतिम निष्कर्षाच्या अधीन असून, दोष सिद्ध होईपर्यंत कोणालाही दोषी ठरविता येणार नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून अधिकृतपणे जाहीर होणाऱ्या पुढील कारवाईकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!