तुकडोजी महाराजांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ सन्मान द्या - सावलीत गुरुदेव भक्तांची जोरदार मागणी @ राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांचेकडे निवेदनातून मागणी


सावली : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाजप्रबोधन, ग्रामविकास, व्यसनमुक्ती आणि राष्ट्रनिर्माणातील अमूल्य योगदानाची दखल घेऊन त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ या देशातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात यावे, अशी मागणी सावली तालुक्यातील गुरुदेव भक्तांनी केली आहे. श्री गुरुदेव सेवा मंडळ तालुका सावली यांच्या वतीने तुकडोजी महाराजांच्या भारतरत्न सन्मानाच्या मागणीसाठी भजन, दिंडीचे आयोजन करण्यात आले. गुरुदेव भक्तांनी घोषणाबाजी करत ही मागणी शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.
        राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीताच्या माध्यमातून ग्रामविकास, स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक एकता, व्यसनमुक्ती आणि राष्ट्रभक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्रासह देशभरातील लाखो नागरिकांना प्रेरणा दिली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून भारत सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी भावना गुरुदेव भक्तांनी व्यक्त केली. यावेळी “राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न सन्मान पुरस्कार द्या” अशी जोरदार मागणी भक्तांनी केली. गुरुदेव प्रार्थना मंदिर पासून निघालेली रॅली तहसील कार्यालय परिसरात पोहचताच राष्ट्रसंतांची भजने सादर केली. यावेळी सावलीचे तहसीलदार प्रांजली चिरडे यांचे मार्फत देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांचेकडे भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीचे निवेदन पाठविण्यात आले. या आंदोलनात श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने गुरुदेव भक्त सहभागी झाले होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!