डेंग्यू-मलेरियाच्या प्रतिबंधासाठी नगर परिषदेकडून धडक मोहीम

डेंग्यू-मलेरियाच्या प्रतिबंधासाठी नगर परिषदेकडून धडक मोहीम
आरोग्य विभागाच्या समन्वयाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग; नागरिकांनाही खबरदारीचे आवाहन


मूल : डेंग्यू व मलेरियासह पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मूल नगर परिषद प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग दिला आहे. यासंदर्भात नगर परिषद व आरोग्य विभागाच्या समन्वयाने आरोग्यविषयक आढावा बैठक घेण्यात आली. नगराध्यक्ष एकता प्रशांत समर्थ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरातील आरोग्य परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीला उपाध्यक्ष राकेश रत्नावर, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, आरोग्य समिती सभापती तसेच मुख्याधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. डेंग्यू, मलेरिया तसेच डासांपासून पसरणाऱ्या अन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार डेंग्यूचा प्रसार करणारा एडिस डास साचलेल्या व स्वच्छ पाण्यातही वाढू शकतो. त्यामुळे घरांच्या परिसरात, छतावर, अंगणात अथवा इतर ठिकाणी पाणी साचू नये, यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाणी साठवणाऱ्या भांड्यांची नियमित स्वच्छता करणे आणि साचलेले पाणी तातडीने काढून टाकणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
शहरात प्रतिबंधात्मक कारवाईला वेग
नगर परिषद व आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत शहरातील संभाव्य डास उत्पत्तीची ठिकाणे शोधून त्याठिकाणी आवश्यक ती प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. यामध्ये अँटी लार्वा औषधांची फवारणी, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करणे, आवश्यक ठिकाणी धूरफवारणी तसेच जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे.
डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांची माहिती नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाला द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच डेंग्यू किंवा मलेरियाची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून उपचार न करता अधिकृत वैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने सांगितले.
नगराध्यक्ष एकता प्रशांत समर्थ यांनी नागरिकांनी प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सहकार्य करावे, तसेच आपल्या घरासह परिसरात स्वच्छता राखून पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!