अड्याळ टेकडी प्रकरण तापले; गुरुदेवभक्तांचा आंदोलनाचा इशारा

तहसीलदारांचा मालकी हक्कासंदर्भातील अहवाल मागे घेण्याची मागणी.. वरोऱ्यात एसडीओंना निवेदन

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील भक्त निवासाच्या बांधकामाला देण्यात आलेली मंजुरी, जमिनीच्या मालकी हक्काचा वाद आणि तहसीलदारांनी दिलेल्या अहवालावरून गुरुदेवभक्तांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वरोरा तालुक्यातील गुरुदेव मंडळाच्या प्रतिनिधींनी दिला आहे.यासंदर्भात गुरुदेव मंडळाच्या वतीने सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी वरोरा येथील उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांना निवेदन देण्यात आले. 
अड्याळ टेकडीवरील जमिनीच्या मालकी हक्काचा वाद न्यायालयीन प्रक्रियेत असताना शासन निधीतून भक्त निवासाचे बांधकाम सुरू करण्यात आल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच २८ जुलै २०२६ रोजी तहसीलदारांनी दिलेला मालकी हक्कासंदर्भातील अहवाल वस्तुस्थितीविरोधी असल्याचा आरोप गुरुदेवभक्तांनी केला आहे.निवेदनानुसार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या भू-वैकुंठ समितीमार्फत अड्याळ टेकडी परिसरात अनेक वर्षांपासून आध्यात्मिक तसेच सामाजिक कार्य सुरू आहे. संबंधित जमिनीवर समितीचा दीर्घकाळ ताबा व वहिवाट असल्याचा दावा करण्यात आला आहे.अड्याळ टेकडीवरील मालकी हक्कासंदर्भात काही संस्थांनी न्यायालयात दावे दाखल केले होते. मात्र कनिष्ठ न्यायालय तसेच जिल्हा न्यायालयाने संबंधित दावे फेटाळल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. त्यानंतर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत भू-वैकुंठ समितीचा ताबा व वहिवाट मान्य करण्यात आल्याचा दावा गुरुदेव मंडळाच्या प्रतिनिधींनी केला आहे.दरम्यान, २२ जुलै २०२६ रोजी तलाठी मंडळाने केलेल्या पंचनाम्यात ग्रामपंचायतीच्या अधिकारक्षेत्राचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यानंतर २८ जुलै रोजी तहसीलदारांनी अड्याळ टेकडीवरील काही गट क्रमांकांवर अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळ, मोझरी यांची मालकी असल्याचा अहवाल दिल्याचे निवेदनात नमूद आहे. याच अहवालाला गुरुदेवभक्तांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
या पार्श्वभूमीवर भक्त निवासाच्या बांधकामाची मंजुरी रद्द करावी, तहसीलदारांचा अहवाल मागे घ्यावा तसेच या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.अड्याळ टेकडी प्रकरणावरून गुरुदेवभक्तांचा असंतोष वाढत असून, प्रशासनाने प्रश्नाची तातडीने दखल न घेतल्यास मोठ्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. विविध जिल्ह्यांतील हजारो गुरुदेवभक्तांना या आंदोलनात सहभागी करून घेण्याची तयारी सुरू असल्याचेही प्रतिनिधींनी सांगितले.यावेळी वाल्मिक वैद्य, कुंदन वाटकर, प्रबोधनकार आशिष माणूसमारे, सुधाकर गोवरदीपे, माणिक डुकरे, डॉ. अंकुश आगलावे, गुलाब गाडगे, चंद्रशेखर वाटकर यांच्यासह वरोरा तालुक्यातील गुरुदेव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.गुरुदेवभक्तांच्या धार्मिक भावना तसेच न्यायालयीन प्रक्रियेचा सन्मान राखून प्रशासनाने या प्रकरणी वस्तुनिष्ठ चौकशी करून तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा आंदोलन तीव्र झाल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी शासन-प्रशासनाची राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!