अल्पवयीनांच्या बेफाम वाहनचालनाला लगाम; तळोधी पोलिसांची कठोर कारवाई
तळोधी (बा.) वार्ताहर :अल्पवयीन मुलांकडून होणारे बेकायदेशीर वाहनचालन रोखण्यासाठी तळोधी पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान दुचाकी चालविताना आढळलेल्या एकूण ८ अल्पवयीन वाहनचालकांच्या मोटारसायकली ताब्यात (डिटेन) घेण्यात आल्या.
कारवाईनंतर संबंधित अल्पवयीनांच्या पालकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्याचे धोके, वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व तसेच अपघातांमुळे होणारे गंभीर परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच संबंधितांवर मोटार वाहन कायद्यान्वये आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात आली. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये व वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गुहे यांनी केले.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक उंदीरवाडे साहेब,वाहतूक पोलीस स्वप्निल चांदेकर, भक्तकबीर लेनगुरे, राहुल चिमूरकर व उत्तम गुगवा यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गुहे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. अल्पवयीनांकडून होणारे वाहनचालन रोखण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!