सफाई कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी नगरसेविका प्राची आकेवार मैदाना
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन; मागण्या पूर्ण न झाल्यास काम बंदचा इशारा
मूल, दि. २६ ऑगस्ट २०२६ : शहराची स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी वर्षानुवर्षे राबणाऱ्या सफाई कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी नगरसेविका सौ. प्राची आकेवार यांनी पुढाकार घेत आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन दिले. मागण्या तातडीने मार्गी न लागल्यास सफाईचे काम बंद ठेवण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
मूल नगरपरिषद अंतर्गत घनकचरा संकलन, ड्रेनेज सफाई, नाली सफाई आणि शहर स्वच्छतेची विविध कामे सफाई कंत्राटी कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे करीत आहेत. मात्र, शहर स्वच्छ ठेवणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्याच वेतन, सेवा आणि कामाच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
किमान वेतन द्या; अन्यायाने कामावरून कमी करू नका!
निवेदनातून सर्व सफाई कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या कालावधीचा विचार करून त्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शासनाच्या नियमानुसार किमान वेतन देण्यात यावे, कोणत्याही कर्मचाऱ्याशी गैरव्यवहार करून त्याला मनमानी पद्धतीने कामावरून कमी करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
मागण्या पूर्ण होईपर्यंत सफाईचे काम बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला असून, मागण्या मान्य झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात आश्वासन व सहकार्याची प्रत द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
‘शहर स्वच्छ ठेवणाऱ्या हातांना न्याय मिळालाच पाहिजे!’
शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत ऊन-पाऊस झेलत सफाई कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडेच दुर्लक्ष होत असेल, तर हा अन्याय असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
नगरसेविका प्राची आकेवार यांनी या प्रश्नात पुढाकार घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आता आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
“शहर स्वच्छ ठेवणाऱ्या हातांना न्याय मिळालाच पाहिजे!” या भूमिकेतून सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला आता निर्णायक वळण देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!