कबड्डीच्या मैदानातून शिष्यवृत्तीच्या गुणवत्तेपर्यंत; शशांकची दमदार कामगिरी

चिमूर तालुक्यातून जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत निवड होणारा एकमेव विद्यार्थी; १५ ऑगस्टला आई-वडिलांसह होणार विशेष सन्मान

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अभ्यास आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शशांक चरणदास गायकवाड याने आपल्या गुणवत्तेची दमदार छाप उमटवली आहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोथली (वहाणगाव) येथे सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात इयत्ता सातवीत शिक्षण घेत असताना शशांकने शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. चिमूर तालुक्यातून इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत शिष्यवृत्तीधारक म्हणून निवड झालेला तो एकमेव विद्यार्थी ठरला आहे.

शशांकची गुणवत्ता केवळ अभ्यासापुरती मर्यादित नसून क्रीडा क्षेत्रातही त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभ्यासासोबतच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये शाळेचे प्रतिनिधित्व करत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या गुणवत्तापूर्ण सहभागामुळे सन २०२५-२६ मधील बीटस्तरीय शालेय सांस्कृतिक तथा क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोथलीने चॅम्पियनशिप पटकावली. त्यामुळे शशांकच्या वैयक्तिक यशासोबतच शाळेच्या लौकिकातही भर पडली आहे.

कबड्डी हा शशांकचा आवडता खेळ असून मैदानावर मेहनत, जिद्द आणि संघभावनेच्या जोरावर त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. भविष्यात कबड्डीमध्ये करिअर करण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांमध्येही यश मिळविण्याचा त्याचा मानस आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेतील यशापूर्वी शशांकने एकलव्य परीक्षेतही पात्रता मिळवली होती. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडा कौशल्य यांचा सुंदर समतोल साधणारा विद्यार्थी म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.

शशांकचे वडील शेतकरी असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. मात्र प्रतिकूल परिस्थितीला न जुमानता मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने मिळविलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता कमी नसते; योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास तेही मोठी भरारी घेऊ शकतात, याचे शशांक हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

१५ ऑगस्टला आई-वडिलांसह होणार गौरव

शशांकच्या या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोथली (वहाणगाव) यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात त्याचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. शाळेच्या वतीने सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन शशांकचा त्याच्या आई-वडिलांसह गौरव करण्यात येणार आहे.

शशांकच्या यशामागे शाळेतील शिक्षकवृंदाचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहनही महत्त्वाचे ठरले आहे. मुख्याध्यापिका विद्या मते, तसेच विलास काकडे, गोपाळ गुडधे, मीनाक्षी बलकी, गजानन काळे आणि किरण सोनवणे यांनी त्याच्या शैक्षणिक व क्रीडा वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.

अभ्यासाच्या वहीपासून ते कबड्डीच्या मैदानापर्यंत सातत्याने मेहनत करणाऱ्या शशांकने मिळविलेले हे यश बोथली शाळेसह संपूर्ण चिमूर तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरले आहे. शेतकरी कुटुंबातील या गुणवंत विद्यार्थ्याची शिष्यवृत्तीतील झेप आणि कबड्डीतील स्वप्ने त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशादायी ठरत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!