स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप
नगराध्यक्ष अर्चना आशिष ठाकरे यांच्या उपस्थितीत मालवीय, गांधी व आंबेडकर शाळेतील विद्यार्थ्यांना किटचे वितरण
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला वरोरा शहरातील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देणारा प्रेरणादायी उपक्रम १४ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडला. मालवीय शाळा, गांधी शाळा आणि आंबेडकर शाळेतील नर्सरीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. नगराध्यक्ष अर्चना आशिष ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
या शैक्षणिक किटमध्ये शालेय पोशाख, बूट, शालेय बॅग, पाण्याची बाटली, टिफिन बॉक्स आणि टिफिन बॅग अशा विद्यार्थ्यांना दैनंदिन शाळेसाठी आवश्यक वस्तूंचा समावेश होता. एकाच किटमध्ये शाळेसाठी लागणाऱ्या मूलभूत वस्तू उपलब्ध झाल्याने चिमुकल्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.
नगराध्यक्ष अर्चना आशिष ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. बालवयात विद्यार्थ्यांना आवश्यक साधने उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या शिक्षणाची सुरुवात अधिक आनंददायी आणि आत्मविश्वासपूर्ण होण्यास मदत होते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमातून राष्ट्रप्रेमासोबतच बालशिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि समान शैक्षणिक संधीचा संदेश देण्यात आला. चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेसाठी आवश्यक वस्तूंची किट देऊन त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला हातभार लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमास नगर उपाध्यक्ष योगिता नेरकर यांच्यासह गजानन मेश्राम, अभय ठावरी, गजानन जिवतोडे, अनिल झोटिग, राहुल देवळे, बंडू देऊळकर, रोशनी भडके, मंगला पिंपळकर, सुषमा चांभारे, रेखा तुलतुमंडे, आशा आसेकर आणि मनीषा दानव आदी नगरसेवक तसेच शाळांचे शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!