पवनीच्या मुख्य मार्गावर जलवाहिनी फुटली; पाणी वाया, नागरिकांना गढूळ पाणी!
नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षाचा कळस; स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचीही गैरसोय
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या पवनी शहरात नगरपरिषद प्रशासनाच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे निघत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शहरातील आंबेडकर चौक परिसरात मुख्य नळाची जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असतानाही नगरपरिषद प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
एकीकडे शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टंचाईचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाचा ‘पाणी वाचवा’चा संदेश नेमका कोणासाठी? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
पाण्याची नासाडी अन् नागरिकांच्या घशाला कोरड!
मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, पाणीपुरवठ्याचे नियोजनही विस्कळीत झाले आहे. काही भागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसताना मुख्य पाइपलाइनमधून पाण्याची अक्षरशः नासाडी होत आहे. त्यातच काही ठिकाणी नळांना गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यावश्यक बाबीकडे इतके गांभीर्याने दुर्लक्ष होत असेल तर नगरपरिषद प्रशासन नेमके कोणत्या कामात व्यस्त आहे? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
शहर की ‘खड्ड्यांचे साम्राज्य’?
पवनी शहरातील विविध चौक व प्रमुख मार्गांवर जलवाहिन्यांच्या कामासाठी खोदलेले मोठमोठे खड्डे नागरिकांच्या जीवावर उठले आहेत. रस्त्यांवर नेमका कोणता मार्ग धरून जायचे, असा प्रश्न वाहनचालक, पादचारी आणि विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.
फुटलेल्या पाइपलाइनमुळे रस्त्यावर पाणी, बाजूला खड्डे आणि त्यात वाहतुकीची कोंडी—अशा परिस्थितीत नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाआधी प्रशासनाला जाग येणार का?
विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम अगदी तोंडावर आला आहे. नगरपरिषद कार्यालयात होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी याच प्रमुख मार्गाने जाणार आहेत. अशा परिस्थितीत रस्त्यावर पडलेले खड्डे, वाहणारे पाणी आणि अस्वच्छता विद्यार्थ्यांसाठी तसेच नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते.
आंबेडकर चौक परिसरात ही समस्या उघडपणे दिसत असतानाही संबंधित लोकप्रतिनिधी व नगरपरिषद प्रशासनाने अद्याप ठोस उपाययोजना न केल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे. परिसरातील नगरसेवक मनीषाताई गोमासे यांचे निवासस्थानही लगत असतानाही ही समस्या प्रशासनाच्या निदर्शनास कशी आली नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मुख्याधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
पाणीपुरवठा, रस्ते आणि स्वच्छता या मूलभूत सुविधांची जबाबदारी नगरपरिषदेची असताना शहरातील विद्यमान परिस्थिती प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, पदाधिकारी आणि नगराध्यक्ष यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करावी, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आणि गढूळ पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पाणी वाया जाऊ देणे, नागरिकांना टंचाईत ठेवणे आणि गढूळ पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष करणे—हा कारभार किती दिवस चालणार? असा संतप्त सवाल आता पवनीकर विचारत आहेत. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!