धरणांतील वाढत्या जलसाठ्यामुळे वरोरा तालुक्याच्या अर्थचक्राला मिळाली गती

चारगाव धरणात 72.23%, भटाळा प्रकल्पात 65.26% तर निमढेला तलावात 51.73% जलसाठा; शेतकरी शेतीच्या कामात गुंतले

तालुका - प्रतिनिधी : जगदीश पेंदाम

वरोरा : - तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. चारगाव बु. मध्यम प्रकल्पात 72.23 टक्के, भटाळा लघु प्रकल्पात 65.26 टक्के तर चंदई (निमढेला) मध्यम प्रकल्पात 51.73 टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या चिंतेला मोठा दिलासा मिळाला असून ग्रामीण भागातील अर्थचक्रालाही नवसंजीवनी मिळाली आहे.
तालुक्यात खरीप हंगामाची जोरदार सुरुवात झाली असून शेतकरी कपाशी, सोयाबीन, तूर व धान पिकांच्या लागवडीनंतर मशागतीच्या विविध कामांत व्यस्त आहेत. दुसरीकडे शेतमजुरांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे.
31 मे 2026 च्या अहवालानुसार चारगाव, चंदई, शेगाव बु. व शेगाव खुर्द येथील प्रकल्पांमध्ये जलसाठा अत्यल्प होता. मात्र जून-जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः चारगाव बु. धरणात 50 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे.

चारगाव बु. मध्यम प्रकल्पातून वरोरा व भद्रावती तालुक्यातील सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जातो. या प्रकल्पाचा लाभ बोरगाव कवडशी, चारगाव खुर्द, चारगाव बु., मानोरा, कारेगाव, धानोली, दादापूर, नवरगाव रिठ, शेगाव खुर्द, पारोधी, चंदनखेडा, चंदनखेडा मक्ता, चरुड व चरुड दारापुरे या गावांतील शेतकऱ्यांना होतो.

चंदई (निमढेला) मध्यम प्रकल्पाचा लाभ अर्जुनी, तुकुम, कोकेवाडा, विलोळा, आष्टा, बेलगाव, शिवणी, मानकर, काटवल भगत, वडाळा, तामसी रिठ व सोनेगाव परिसरातील शेतीला मिळतो. तर शेगाव बु. व शेगाव खुर्द लघु प्रकल्पांमुळे शेगाव बु., दादापूर, मानोरा, अंतापूर, खेकडापूर रिठ, बोरगाव धांडे व चरुड परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळतो.

दरवर्षीप्रमाणे यंदाही 15 ऑगस्टपासून सिंचनासाठी धरणाचे पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे धानासह खरीप पिकांना वेळेवर पाणी मिळणार असून उत्पादनात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तालुक्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. जूनपासून सुरू होणारा धान हंगाम डिसेंबरपर्यंत चालत असल्याने या काळात शेतकरी, शेतमजूर तसेच शेतीशी निगडित विविध व्यवसायांना मोठा आधार मिळतो. सध्या धरणांतील समाधानकारक जलसाठ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून यंदाचा खरीप हंगाम चांगला होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!