ग्रामस्थांच्या श्रमदानातून हरित संकल्प साकार; बरडघाट स्मशानभूमीत वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात येत असलेल्या बरडघाट येथे पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि भावी पिढ्यांसाठी हिरवाई जपण्याचा संकल्प डोळ्यासमोर ठेवत मौजा बरडघाट येथे एक स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. डब्ल्यू.सी.एल. (सी.एम.पी.डी.आय.) कॉलनी, मुरपार यांच्या सहकार्याने तसेच मौजा बरडघाट ग्रामस्थांच्या श्रमदानातून गावातील स्मशानभूमी परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
गावाच्या विकासात पर्यावरण संवर्धनाला तितकेच महत्त्व आहे, या भावनेतून ग्रामस्थांनी एकत्र येत स्मशानभूमी परिसर हिरवागार करण्याचा संकल्प केला. श्रमदानाच्या माध्यमातून परिसराची स्वच्छता करण्यात आली आणि त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले. भविष्यात ही झाडे मोठी होऊन परिसराला सावली, स्वच्छ हवा आणि निसर्गसंपन्न वातावरण प्रदान करतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

आजच्या वाढत्या प्रदूषणाच्या आणि तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन आणि संरक्षण करणे हीच खरी पर्यावरण सेवा असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

या उपक्रमामुळे स्मशानभूमी परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि हरित होण्यास निश्चितच मदत होणार असून ग्रामस्थांच्या एकजुटीचे आणि सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण या माध्यमातून पाहायला मिळाले. गावाच्या विकासासाठी लोकसहभाग किती महत्त्वाचा असतो, याची प्रचिती या उपक्रमातून आली.

या वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमोद श्रीरामे, देवराव भोयर, रामचंद्र सहारे, देवराव दोडके, कवडू बारेकर, मनोहर सहारे, विनोद भोयर, सूर्यभान दोडके, राहुल दोडके, रवींद्र बारेकर, मनोहर मेश्राम, बापूराव भोयर, प्रशांत दोडके, नीलकंठ दोडके तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उपस्थितांनी भविष्यातही अशाच सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून साकार झालेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाचा एक आदर्श ठरत असून, "हरित गाव – स्वच्छ गाव" या संकल्पनेला बळकटी देणारा ठरला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!