मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी महिलांच्या चकरा - अपात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे नाही
चंद्रपूर - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांची गावनिहाय व तालुकानिहाय यादी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्याकडे उपलब्ध नसल्याची माहिती माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत मागविलेल्या माहितीच्या उत्तरातून समोर आली आहे. लाभासाठी महिला कार्यालयात पायपीट करीत असतांना ती यादीच उपलब्ध नसल्याने योजनेच्या पारदर्शक्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
अनेक महिलांचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळणे अचानक बंद झाल्याने ग्रामीण भागातील महिला चंद्रपूर येथील महिला व बालविकास विभागाकडे पायपीट करीत आहेत मात्र त्यांना समाधानकारक उत्तरे दिल्या जात नाही. यामुळे सावली पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांनी १२ जून २०२६ रोजी माहिती अधिकारांतर्गत अर्ज करून १ जानेवारी २०२५ पासून आजपर्यंत योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांची गावनिहाय, तालुकानिहाय अपात्रतेच्या कारणांसह यादी मागितली होती. यावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने २ जुलै २०२६ रोजी दिलेल्या लेखी उत्तरात शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर आधार क्रमांकाद्वारे अर्जाची स्थिती तपासता येते, मात्र अर्जदाराने मागितलेली गावनिहाय व तालुकानिहाय यादी कार्यालय स्तरावर उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांना अपात्र केले असतांना जिल्हा स्तरावरील कार्यालयाकडे अपात्र लाभार्थ्यांची गावनिहाय यादीच उपलब्ध नसल्याने पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपात्रबाबत महिलांना माहिती मिळत नसल्याने कार्यालयात चकरा मारूनही समाधानकारक माहिती किंवा लाभ मिळत नसल्याने महिलांमध्ये संताप आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!