चिचघाट येथे दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यांना मारहाण; पोलीस पाटलालाही धक्काबुक्की,
सकाळी नऊ वाजता पासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनच्या पटांगणात नागरिकांचा ठिय्या
अखेर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
अवैध दारू विक्रीला विरोध केल्याचा राग; अश्लील शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकीl
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - शेगाव (बु.) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येत असलेल्या चिचघाट येथे गावातील दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यांनी अवैध दारू विक्री रोखण्याचा प्रयत्न केला असता तिघांनी महिला सदस्यांशी धक्काबुक्की, अश्लील शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी (दि. १३ जुलै) सकाळी घडली. या प्रकरणी शेगाव (बु.) पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अंकुश बाबा शिवरकर (पोलीस पाटील, रा. चिचघाट) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गावातील महिला मंडळाने दयाराम हिवरकर यांच्या शेताजवळ अवैध दारू पकडल्याची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी गेले. तेथे महिला मंडळाच्या सदस्यांनी दारू जप्त करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी पंजाब अंधरेले, अर्जुन अंधरेले व सागर अंधरेले (रा. वाहनगाव) यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या झटापटीत काही महिलांना किरकोळ दुखापत झाली असून फिर्यादी पोलीस पाटील मध्यस्थी करण्यासाठी गेले असता त्यांनाही धक्काबुक्की करून शर्ट फाडण्यात आला व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर आरोपी दारूची पिशवी घेऊन तेथून पसार झाले.
यावेळी गावातील उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील सहित महिला,पुरुष, युवक यांनी मोठ्या प्रमाणात शेगाव पोलीस स्टेशनच्या पटांगणात सकाळी नऊ वाजता पासून ते सायंकाळी सहा वाजता पर्यंत ठिय्या मांडत दारूबंदी करीता ठाम भूमिका घेतली असता वरोरा पोलीस ठाण्याचे सपोनि यांनी मध्यस्थी करून गावातील नागरिकांना विश्वासात घेऊन शांत केले.
एकीकडे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून कायद्याचा वचक निर्माण करीत असताना शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावत आहे. दोन दिवसाआधी स्थानिक शेगाव मध्येच अवैध रेती तस्करांकडून तलवारीने वाढदिवसाच्या केक कापण्याची घटना ताजी असतानाच अशाप्रकारे अवैध धंदे करणारे जर खुलेआम नागरिकांना धमक्या देत असतील तर त्यांना कायद्याचा धाक उरला नाही का शेगाव येथील पोलीस प्रशासन मुंग गिळून गप्प आहे का? असा प्रश्न शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.
या प्रकरणी शेगाव (बु.) पोलीस ठाण्यात आरोपी पंजाब अंधरेले, अर्जुन अंधरेले व सागर अंधरेले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 115(2), 132, 296, 3(5) आणि 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुमित ईश्वर कांबळे करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!