पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांवर अकोल्यात राज्यस्तरीय मंथन; १९ जुलैला भव्य अधिवेशन, चर्चासत्र व पुरस्कार सोहळा

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - पत्रकारांवरील वाढते हल्ले, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासमोरील आव्हाने, पत्रकारांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना तसेच गुणवंत पत्रकारांच्या कार्याचा गौरव या दुहेरी उद्देशाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी अकोला येथे भव्य राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन, चर्चासत्र व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
    प्रसंगी अकोला येथील हॉटेल कृष्णा इम्पेरियल (नवीन बसस्थानकाजवळ) येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत होणाऱ्या या एकदिवसीय अधिवेशनात राज्यभरातील पत्रकार, संपादक, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.
     कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी राहणार आहेत. यावेळी मा. न्याय. चंद्रलाल मेश्राम, खासदार अनुप धोत्रे, खासदार रणधीर सावरकर, डॉ. विश्वासराव आरोटे, नितीन देशमुख, आमदार हरीश पिंपळे, आमदार साजिद खान पठाण, आमदार वसंत खंडेलवाल, माजी आमदार नारायण गव्हाणकर, माजी आमदार बळीराम सिरस्कार, प्रकाश तायडे, सेवकराम ताथोड, डॉ. संतोष हुसे, श्रीकृष्ण अंधारे, संदीपदादा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १२ वाजता "पत्रकारांवरील वाढते हल्ले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शिस्तभंगाची कारवाई" या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक निरंजन टकले, एबीपी माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक, दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, एएनएन न्यूजचे संपादक निलेश धाडीकर, वंचितचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे तसेच सामाजिक प्रवक्ते निरंजन शिरसाट हे मार्गदर्शन करणार आहेत
     तसेच दुपारी ३ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ प्रदेशाध्यक्ष नयन मोंढे राहणार असून प्रा. महेश पानसे, किशोर रायसाकडा, नवनाथ जाधव, वैभव स्वामी, मधुकर बावणे, अलका पचारे, अनुप भार्गव, हरिदास भदे, माजी आमदार गजानन वाघमारे, विवेक राऊत, विजय चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील.
     यावेळी जीवन गौरव, दीपस्तंभ, पत्रकारिता, उत्कृष्ट पत्रकारिता, जिजाऊ पत्रकारिता, आरोग्य पत्रकारिता, युद्धवार्ता पत्रकारिता, तिसरा डोळा पत्रकारिता, विवेकवादी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती, आदर्श शिक्षक, शेतकरी कृषी पुरस्कार अशा विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी राज्यातील विविध माध्यमांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.
     याशिवाय महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या प्रदेश, विभागीय, जिल्हाध्यक्षांना राज्यस्तरीय गौरव प्रदान करण्यात येणार असून तालुकाध्यक्षांना संघटनेच्या वतीने साहित्य वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
     दरम्यान राज्यातील सर्व पत्रकारांनी या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहून पत्रकार एकजूट, पत्रकार सुरक्षा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन अकोला जिल्हाध्यक्ष गणेश सुरजुसे तसेच देवानंद गहिले, प्रदीप गावंडे, संजय उमक आणि वानखडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!