"छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान" अंतर्गत २२ जुलै रोजी चिमूर येथे शिबिराचे आयोजन

संत तुकाराम महाराज सभागृह आठवडी बाजार, चिमूर येथे 

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - दि. २१ जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तहसील कार्यालय तर्फे "छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान" अंतर्गत बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता संत तुकाराम महाराज सभागृह, आठवडी बाजार, चिमूर येथे विशेष महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, शासनाशी संबंधित दैनंदिन अडचणी व तक्रारींचे त्वरित निराकरण करणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शासन निर्णयानुसार राज्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे.

या शिबिरामध्ये महसूल विभाग, पंचायत समिती, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, नगर परिषद, महावितरण, कृषी विभाग तसेच इतर विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांना विविध योजनांची माहिती, मार्गदर्शन, अर्ज स्वीकृती आणि तक्रारींचे निराकरण करतील.

चिमूर विधानसभा क्षेत्रातील या शिबिराचे आयोजन आमदार किर्तीकुमार उर्फ (बंटी) भांगडिया यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. तसेच नागरिक, शेतकरी, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी केले आहे.

हे शिबिर नागरिकांच्या समस्या एकाच ठिकाणी सोडविण्यासाठी तसेच शासनाच्या योजना प्रभावीपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या संधीचा व शिबिराचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!