चिमूरमध्ये अवैध वाळू वाहतुकीवरील 'कथित वसुली'ची ऑडिओ क्लिप व्हायरल; निष्पक्ष चौकशीची मागणी जोरात
ऑडिओ क्लिपची शहानिशा करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिनांक.१५/०७/२०२६ चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात अनेक वर्षांपासून हायवा ट्रक व ट्रॅक्टरद्वारे कथितरित्या अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. ही वाहतूक चिमूर तहसील कार्यालयासमोरूनही होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. याबाबत महसूल व पोलीस विभागाकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कथित ऑडिओ क्लिपमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या क्लिपमध्ये अवैध वाळू वाहतुकीच्या बदल्यात काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कथित वसुली होत असल्याचे संभाषण असल्याचा दावा केला जात आहे. संबंधित ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप अधिकृतरीत्या पडताळण्यात आलेली नाही.
माहितीनुसार, दैनिक हिंदू जागरचे वर्धा येथील संपादक रोशन ठाकूर यांनी वाळू माफियाचे रूप धारण करून चिमूर येथील कथित वाळू माफिया प्रथम बाळबुधे यांच्याशी मोबाईलवर संवाद साधल्याचा दावा करण्यात आला आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम चॅनेल व व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित झाल्यानंतर चिमूरसह राज्यभर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
जर या ऑडिओ क्लिपमधील आरोपांमध्ये तथ्य आढळले, तर संबंधित अधिकारी, कर्मचारी व इतर संबंधित व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), मोबाईल डेटा व इतर तांत्रिक पुराव्यांची तपासणी करण्यात यावी, अशीही मागणी पुढे येत आहे.
या संपूर्ण प्रकरणात ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक पडताळणी, संबंधित व्यक्तींची चौकशी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सत्य समोर आणून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!