आधी निविदा, नंतर अभ्यास; मूल नगर परिषदेचा 'वरातीमागून घोडे' कारभार!

आधी निविदा, नंतर अभ्यास; 'वरातीमागून घोडे' कारभारावर प्रश्नचिन्ह!
'इंडस्ट्रियल वेस्ट'च्या नावाखाली कंत्राट फुगविल्याचा आरोप; आता राईस मिल असोसिएशनची बैठक बोलावल्याने संशय अधिक गडद


मूल | प्रतिनिधी
मूल नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन निविदेतील 'इंडस्ट्रियल वेस्ट'च्या नावाखाली दरमहा सुमारे १२ लाख रुपयांनी कंत्राटाची रक्कम वाढविल्याचा आरोप होत असतानाच नगराध्यक्षांनी आता राईस मिल असोसिएशनची बैठक बोलावल्याने संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. निविदा प्रसिद्ध केल्यानंतर, कंत्राटाची रक्कम वाढविल्यानंतर आणि या निर्णयावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आता उद्योगांची मते जाणून घेण्यासाठी बैठक बोलावली जात असल्याने, नगर परिषदेने कोणताही अभ्यास, सर्वेक्षण किंवा मागणी न तपासता निर्णय घेतला होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नगराध्यक्षांनी राईस मिल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे नमूद केले आहे. या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन निविदेतील औद्योगिक कचऱ्याबाबतच्या तरतुदी, राईस मिल उद्योगांच्या प्रत्यक्ष गरजा, कचरा संकलनाची आवश्यकता आणि अंमलबजावणीची प्रक्रिया यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.
मात्र, याच पत्रामुळे प्रशासनाची भूमिका अधिकच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण, प्रत्यक्ष गरजा आणि आवश्यकता निश्चित करण्यासाठी आज बैठक घ्यावी लागत असेल, तर 'इंडस्ट्रियल वेस्ट'चा समावेश करून लाखो रुपयांचे वाढीव अंदाजपत्रक आधीच कशाच्या आधारावर तयार करण्यात आले? असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
यापूर्वी शहरातील अनेक राईस मिल चालकांनी आमच्याकडून अशा प्रकारच्या कचरा संकलनाची कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केले होते. नगर परिषदेकडेही अशी कोणतीही लेखी मागणी नसल्याचे समोर आले आहे. तरीही मूल शहरात स्वतंत्र औद्योगिक क्षेत्र नसताना 'इंडस्ट्रियल वेस्ट'चा समावेश करून दरमहा सुमारे १२ लाख रुपयांची वाढ करण्यात आल्याने या निर्णयामागील उद्देशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
'वरातीमागून घोडे' ही म्हण मूल नगर परिषदेच्या कारभाराला अगदी तंतोतंत लागू पडत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. आधी निविदा काढणे, त्यात 'इंडस्ट्रियल वेस्ट'च्या नावाखाली लाखो रुपयांची तरतूद करणे आणि त्यानंतर या विषयावर राईस मिल असोसिएशनची बैठक बोलावणे म्हणजे चूक उघड झाल्यानंतर कागदोपत्री समर्थन शोधण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.
सामान्यपणे अशा प्रकारच्या निविदा प्रसिद्ध करण्यापूर्वी संबंधित घटकांशी चर्चा, प्रत्यक्ष पाहणी, गरजांचे सर्वेक्षण आणि तांत्रिक अभ्यास केला जातो. मात्र, मूल नगर परिषदेत आधी निर्णय, नंतर चर्चा आणि शेवटी त्याचे समर्थन शोधण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आता अधिक तीव्र झाला आहे.
घनकचरा व्यवस्थापनाच्या निविदेतील जाचक अटी, मजुरांची कपात आणि आता 'इंडस्ट्रियल वेस्ट'च्या नावाखाली वाढविलेल्या अंदाजपत्रकानंतर राईस मिल असोसिएशनची बैठक या सर्व घडामोडींमुळे नगर परिषदेच्या संपूर्ण निविदा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. करदात्यांच्या पैशांचा वापर जनहितासाठी होत आहे की विशिष्ट हितसंबंध जपण्यासाठी, याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
नगर परिषदेची राईस मिल मालकांकरिता सूचना 

प्रति,
अध्यक्ष / पदाधिकारी,
राईस मिल असोसिएशन, मूल.

विषय : घनकचरा व्यवस्थापन निविदेतील औद्योगिक कचऱ्याबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीस उपस्थित राहण्याबाबत.

महोदय,

मूल नगर परिषदेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन निविदेच्या अनुषंगाने राईस मिल तसेच इतर तत्सम औद्योगिक आस्थापनांमधून निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे संकलन, वाहतूक व शास्त्रोक्त व्यवस्थापन यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी मा. नगराध्यक्षा यांच्या दालनात उद्या दिनांक 29.07.26 रोजी सकाळी ११.०० वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सदर बैठकीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेतील औद्योगिक कचऱ्याबाबतच्या तरतुदी, राईस मिल उद्योगांच्या प्रत्यक्ष गरजा, कचरा संकलन व व्यवस्थापनाची आवश्यकता यासंदर्भातील बाबी तसेच अंमलबजावणीच्या प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

तरी मूल राईस मिल असोसिएशनचे सर्व संबंधित पदाधिकारी व प्रतिनिधींनी या बैठकीस उपस्थित राहून आपले मत व सूचना मांडाव्यात, ही नम्र विनंती.

आपली उपस्थिती अपेक्षित आहे.

नगराध्यक्षा
मूल नगर परिषद, मूल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!