स्मार्ट मीटरच्या विरोधात बल्लारपूरमध्ये जनआक्रोश : महावितरणवर मनमानीचा आरोप
- स्मार्ट मीटर योजना मागे घेण्याची मागणी
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण)कडून घराघरांत स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेविरोधात आणि वाढीव वीजबिलांच्या कथित तक्रारींच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर कृती समितीच्या नेतृत्वाखाली नगर परिषद चौकात मंगळवारी मोठे जनआंदोलन करण्यात आले. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस सुरू असतानाही शेकडो नागरिक आंदोलनस्थळी ठामपणे उपस्थित राहून स्मार्ट मीटर योजना रद्द करण्याची मागणी करत महावितरणविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
त्यानंतर झालेल्या सभेत विविध मान्यवरांनी महावितरणवर नागरिकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.
वक्त्यांनी असा दावा केला की, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक वीजबिले येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. महागाईच्या काळात गरीब, शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित नेत्यांनी इशारा देत सांगितले की, स्मार्ट मीटर सक्तीने बसविण्याची प्रक्रिया तातडीने थांबवून वाढीव वीजबिलांची निष्पक्ष चौकशी करण्यात आली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. हा केवळ वीजबिलांचा प्रश्न नसून सामान्य नागरिकांच्या हक्कांचा आणि त्यांच्या आर्थिक हिताचा विषय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी, प्रशांत झांमरे, नगर परिषद उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, नगरसेवक सिक्की यादव, अब्दुल करीम शेख, इस्माईल ढाकवाला, भास्कर मकोडे, भारत थुलकर, कुतुबुद्दीन सिटी, उमेश कडू, पवन मेश्राम, नरेंद्र सोनारकर, मंगेश बावने, कल्पना गोरघाटे, ज्योती गहलोत, शाहिद शेख, अभिलाष चुनारकर, अफजल शेख आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सूरज चौबे, रोहित चुटे, अजय गिदवानी, कैलाश धानोरकर, गौतम रामटेके, युसूफ, प्रकाश पाठक आणि अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज चौबे यांनी केले, तर रोहित चुटे यांनी आभार मानले. यावेळी मोहम्मद रफीक यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी आंदोलनात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
मुसळधार पावसातही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवल्याने स्मार्ट मीटर आणि वीजबिलांचा प्रश्न आता व्यापक लोकभावनेचा विषय बनत असल्याचे चित्र दिसून आले. आंदोलनानंतर महावितरण या मागण्यांबाबत कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!