मुल नगर परिषदेच्या घनकचरा निविदेवर प्रश्नचिन्ह; मुख्याधिकाऱ्यांना खुले पत्र



मूल : प्रतिनिधी
मूल नगर परिषदेमार्फत घनकचरा व्यवस्थापनासाठी काढण्यात आलेल्या वादग्रस्त निविदा प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या जिल्हा कार्यक्रम प्रमुख तथा नागरिक प्रा. डॉ. सौ. किरण कापगते-बोरकर यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद मूल यांना खुले पत्र देऊन सदर निविदा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
खुल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, घनकचरा व्यवस्थापनासाठी काढण्यात आलेली नवीन निविदा केवळ सहा महिन्यांसाठी असून, पूर्वीच्या तुलनेत दरमहा सुमारे ₹10 लाखांची वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच निविदेत अशा काही अटींचा समावेश करण्यात आल्याची चर्चा असून, त्यामुळे केवळ विशिष्ट कंत्राटदारालाच लाभ होईल अशी शंका नागरिकांमध्ये व्यक्त होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कचरा संकलनासाठी वापरण्यात येणारी वाहने 2026 सालातील असावीत, अशा अटीमुळे इतर इच्छुक कंत्राटदारांना सहभागी होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो, असा आरोपही पत्रात करण्यात आला आहे. कोणतीही निविदा प्रक्रिया ही पारदर्शक, निष्पक्ष व स्पर्धात्मक असणे आवश्यक असून, अधिकाधिक कंत्राटदारांनी सहभाग घेतल्यास स्पर्धा वाढून नगर परिषदेचा खर्च कमी होईल व जनतेच्या पैशाची बचत होईल, असे त्यांनी नमूद केले.
याउलट, वाढीव दर आणि जाचक अटींमुळे नगर परिषदेच्या कामकाजाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण होत असून, नागरिकांच्या मनात प्रशासनाविषयी संशय निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सद्याची निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करावी आणि सर्वांना समान संधी देणारी, पारदर्शक व स्पर्धात्मक नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी प्रा. डॉ. सौ. किरण कापगते-बोरकर यांनी खुल्या पत्राद्वारे केली आहे.
या खुल्या पत्रामुळे मूल शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या निविदा प्रक्रियेबाबतची चर्चा आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!