अखेर वृत्तपत्राच्या बातमीची प्रशासनाने घेतली दखल

पोलीस प्रशासनाच्या मदतीने सावरी (बिड) येथे शोषखड्ड्याचे बांधकाम पूर्ण

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील ग्रामपंचायत सावरी (बिड) अंतर्गत वार्ड क्रमांक १ व २ यांच्या सीमेवरील शोषखड्डा बांधकामाचा अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला वाद अखेर प्रशासनाच्या हस्तक्षेपाने मार्गी लागला. वृत्तपत्रांमधून या विषयावर सातत्याने बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत अखेर शोषखड्ड्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात वार्ड क्रमांक २ मध्ये नाली बांधकामाचे काम मंजूर झाले होते. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार ग्रामपंचायत हे काम करण्यास सज्ज होती. मात्र, काही नागरिकांनी सांडपाण्याचा मार्ग अडविल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आणि या प्रश्नावरून वाद निर्माण झाला. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, तसेच अनेक बैठका घेण्यात आल्या; मात्र त्यातून समाधानकारक निर्णय होऊ शकला नाही.

यानंतर संबंधित नागरिकांनी नालीऐवजी शोषखड्डा उभारण्याची मागणी केली. ग्रामपंचायतीने सामंजस्याची भूमिका घेत ही मागणी मान्य केली आणि आवश्यक प्रस्ताव सादर केला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर शोषखड्ड्याचे बांधकाम सुरू करण्यात आले.

शोषखड्ड्याचे पाणी ओव्हरफ्लो झाल्यास त्याचा निचरा होण्यासाठी आउटलेट पाईपलाईन टाकण्याचे नियोजन करण्यात आले होते. सुरुवातीला या निर्णयाला संबंधितांनी संमती दिली होती. मात्र, काम अंतिम टप्प्यात असताना आउटलेट पाईपलाईन न टाकता थेट स्लॅब टाकण्याची मागणी करण्यात आल्याने पुन्हा वाद निर्माण झाला. यावर काही नागरिकांनी हरकत घेत भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी पाईपलाईन आवश्यक असल्याचे मत मांडले.

या प्रकरणात ग्रामपंचायतीने अनेक वेळा दोन्ही बाजूंमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. काम सुरू होताच अडथळे निर्माण होत असल्याने अखेर पोलीस प्रशासनाची मदत घेण्यात आली. शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात शोषखड्ड्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.

ग्रामपंचायतीने यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली होती. त्यानंतर विविध वर्तमानपत्रांमध्ये या विषयावरील वृत्त प्रसिद्ध झाले. या प्रकरणाची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडेही करण्यात आली होती. अखेर प्रशासनाने योग्य वेळी हस्तक्षेप करून हा प्रश्न निकाली काढला.

या कामासाठी सावरी (बिड)च्या सरपंच लोकनाथ रामटेके, ग्रामसेवक निखिल सहारे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप मोटघरे, सुरेखा शेंबेकर, नलू शेंबडे, किरण मेश्राम, ग्रामपंचायत शिपाई दिलीप डांगे तसेच सुरेश मेश्राम यांनी सहकार्य केले.

अनेक दिवसांपासून रखडलेला हा प्रश्न निकाली निघाल्याने वार्ड क्रमांक १ व २ मधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून परिसरातील सांडपाण्याच्या समस्येवरही दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!