बरडघाट येथे वाघाच्या हल्ल्यात राजेंद्र भोयर यांचा मृत्यू; परिसरात भीतीचे वातावरण

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - चिमूर तालुक्यातील बरडघाट परिसरात वाघाच्या हल्ल्यात राजेंद्र तिमाजी भोयर (वय ५० वर्षे) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
        मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र तिमाजी भोयर हे कामानिमित्त बरडघाट परिसरात गेले असता वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हा हल्ला गंभीर स्वरूपाचा असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी तसेच स्थानिक पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर बरंडघाट व आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जंगलालगत शेती करणारे शेतकरी, मजूर तसेच जनावरे चारण्यासाठी जाणारे नागरिक यांना विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
          दरम्यान, ग्रामस्थांनी वाघाचा बंदोबस्त करावा, परिसरात गस्त वाढवावी तसेच मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी पुढील तपास वनविभाग आणि प्रशासनाकडून सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!