शासकीय माध्यमिक आश्रमशाळा , कोसंबी गवळी येथे प्रवेशोत्सव व पालक मेळावा संपन्न …
माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते अत्याधुनिक नमो लॅबचे लोकार्पण ….
विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस आनंददायी होऊन शाळेची आवड निर्माण व्हावी ,तसेच शालेय उपस्थिती वाढावी या उद्देशाने शासकीय माध्यमिक आश्रम शाळा , कोसंबी गवळी ता. नागभीड जि. चंद्रपूर येथे दिनांक ३० जून ला शाळा प्रवेशोत्सव व पालक मेळावा चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चिमुर आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी ( शिक्षण )बाळासाहेब वटाने हे होते.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष भैय्यासाहेब दडमल , कोसंबी गवळी चे उपसरपंच कैलास रंधये , आदिवासी समाज सेवक व माजी पं. स. सभापती दयाराम कन्नाके , कृऊबास संचालक धनराज ढोक , सामाजिक कार्यकर्ता प्रभाकर चिमुरकर व गिरीष नवघडे , पोलीस पाटील सौ. आशाताई दडमल , वैद्यकीय अधिकारी भक्तीताई हिवरकर , पालक प्रतिनिधी खुशाल उईके यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला मान्यवर, पालक वर्ग व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे लेझीम पथकाने स्वागत करण्यात आले. भगवान बिरसा मुंडा , सावित्रीबाई फुले , वीर बाबुराव शेडमाके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. नवागतांचे पुष्पगुच्छ, पाठ्यपुस्तक, ड्रेस ,शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्या हस्ते देऊन स्वागत करण्यात आले.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालक व विद्यार्थ्यां करिता थेट मंत्रालयातुन दिलेला संदेश दाखवण्यात आला. आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके यांनी सुद्धा विद्यार्थी व पालकांना ॲानलाईन मार्गदर्शन केले. मा. विजय वाघमारे आदिवासी विकास विभाग चे सचिव विजय वाघमारे तसेच आदिवासी विकास विभाग च्या आयुक्त लिना बन्सोड यांनी ऑनलाइन द्वारे विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.
प्रवेशोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून संजय गजपुरे व इतर मान्यवरांच्या हस्ते अत्याधुनिक नमो लॅबचे लोकार्पण करण्यात आले. राघोजी भांगरे स्मृती प्रित्यर्थ दहावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या कु.प्रज्ञा रतनलाल गुडेवार, द्वितीय जानवी गुलाबराव एकोडे व तृतीय अनिकेत जयपाल शेडमाके या विद्यार्थ्यांचा व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यात परीसरातील आदिवासी समाजासाठी कार्य करणाऱ्या सेवकांचा सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र, बाळापुर तर्फे नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक, ड्रेस ,शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद भांडारकर सर यांनी करून शाळा गुणवत्ता विकास, भौतिक सुविधा करिता नियमित प्रयत्नशील असते , त्याकरीता शाळेत नियमित उपक्रम राबविल्या जाते. पालकांनी विद्यार्थी उपस्थिती करिता सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे उद्घाटक संजय गजपुरे यांनी नागपुर विभागातुन तृतीय क्रमांक मिळालेल्या या शाळेचे अभिनंदन करीत परिसरात सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणारी एकमेव शाळा म्हणजे शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोसंबी गवळी आहे असे सांगून ही एक आदिवासी समाजा साठी मोठी देण आहे , याचा फायदा घेत आपल्या पाल्याच्या सर्वांगिन विकासासाठी पालकांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले. आदिवासी सेवक श्री दयारामजी कन्नाके यांनी गुरुकुलाचे महत्त्व पटवून दिले व समाजाचा विकास करावा असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब वटाने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहोचले असल्याचे नमुद करुन “ माझी आश्रम शाळा , माझा स्वाभिमान “ असे प्रत्येक पालकांनी व विद्यार्थ्यांनी अभिमान बाळगावा असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षिका कु.मीना श्रीरामे यांनी केले . यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. कार्यक्रम यशस्वी करिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाकरिता परिसरातील पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!