"नववीत शाळा सोडली, हॉटेलमध्ये भांडी घासली... पण पुढे जे घडले ते थक्क करणारे!"
हॉटेलमधील नोकर ते महसूल विभागातील यशस्वी अधिकारी : अमोल करपे यांची प्रेरणादायी यशोगाथा
– विजयाच्या दिशेने संघर्ष, जिद्द आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय
यश हे नेहमीच सरळ रस्त्याने मिळत नाही. अनेकदा खडतर वाटा, अपयशाचे दगड आणि संघर्षाची वादळे पार केल्यानंतरच यशाचा सूर्योदय होत असतो. मूल तालुक्यातील टेकाडी येथील अमोल रामदास करपे यांची जीवनकहाणी हेच सत्य अधोरेखित करणारी आहे.
घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. कुटुंबातील सदस्य कष्टाची कामे करून संसाराचा गाडा ओढत होते. आपल्या शिक्षणासाठी आई-वडिलांना इतके कष्ट करताना पाहून लहानग्या अमोलच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. शाळेत त्याचे मन रमेना. अखेर 2003 मध्ये नववीत शिकत असताना त्याने देवनिल विद्यालयाची शाळा सोडली. शिक्षणाचा धागा तुटला आणि आयुष्य वेगळ्याच वळणावर जाऊन उभे राहिले.
शाळा सोडल्यानंतर अमोलने चामोर्शी गाठले. तेथे एका हॉटेलमध्ये केवळ चारशे रुपये मासिक वेतनावर नोकर म्हणून काम सुरू केले. एका वर्षानंतर तो मूल येथे आला. बसस्थानकाजवळील प्रशांत हॉटेलमध्ये हेल्पर म्हणून काम केले. त्यानंतर शरीफभाई यांच्या बेकरीतील ब्रेड बाजारात विकण्याचे कामही त्याने केले. काही काळ भाग्यरेखा मंगल कार्यालयात दिवाणजी म्हणून काम केले, तर कधी ट्रॅक्टरवर हमाली, कधी शेतमजुरी. पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते काम करण्याची तयारी त्याने ठेवली.
2003 ते 2007 या काळात संघर्षच त्याचा सोबती होता. मात्र नियतीने त्याच्यासाठी वेगळेच काहीतरी लिहून ठेवले होते.
गावातील मित्र प्रशांत पोटवार यांनी अमोलला चंद्रपूर येथे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. प्रशांत स्वतः एमपीएससीची तयारी करत होता. त्यांच्यासोबत इतर काही युवकही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होते. खोलीत रोज अभ्यास, वाचन आणि करिअरची चर्चा होत असे. दुसरीकडे अमोल दिवसभर मयूर हॉटेलमध्ये काम करायचा आणि रात्री थकून परत यायचा. 2007 ते 2012 या कालावधीत तो चंद्रपूरच्या मयूर हॉटेलमध्ये 3 वर्ष आणि स्वाद कॅफेमध्ये 2 वर्ष नौकरी केली.
एके दिवशी प्रशांत पोटवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अमोलला दहावीची परीक्षा देण्याचा सल्ला दिला. “शिक्षण पुन्हा सुरू कर,” हा मित्रांचा आग्रह त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. अमोलने दहावीचा फॉर्म भरला. मित्रांच्या सहवासात अभ्यासाची गोडी लागली. मेहनतीचे फळ मिळाले आणि पहिल्याच प्रयत्नात तो दहावी उत्तीर्ण झाला.
दहावी पास झाल्याने आत्मविश्वास वाढला, पण आर्थिक प्रश्न अजूनही कायम होते. तरीही त्याने हार मानली नाही. दिवसा मयूर हॉटेलमध्ये नोकरी आणि रात्री हिस्लॉप कॉलेजमध्ये अकरावीचे शिक्षण असा त्याचा दिनक्रम सुरू झाला. दिवसभर कष्ट आणि रात्री शिक्षण – हे चक्र त्याने चिकाटीने सुरू ठेवले.
2012 मध्ये चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात चपराशी पदाच्या जागा निघाल्या. अमोलने अर्ज केला. आयुष्यभर संघर्ष केलेल्या या युवकाने परीक्षा आणि मुलाखतीत उत्कृष्ट कामगिरी करत अव्वल स्थान मिळवले. त्याची नियुक्ती मूल तहसील कार्यालयात चपराशी म्हणून झाली.
हा क्षण त्याच्या आयुष्यातील मोठा टप्पा होता. हॉटेलमधील नोकर ते सरकारी कर्मचारी हा प्रवास त्याने जिद्दीच्या जोरावर पूर्ण केला होता. या यशाचे संपूर्ण श्रेय तो आजही आपल्या मित्र प्रशांत पोटवार यांना देतो.
नोकरी मिळाल्यानंतरही अमोल थांबला नाही. मेहनत, प्रामाणिकपणा आणि कामाप्रती असलेली निष्ठा यामुळे तो वरिष्ठांचा विश्वासू कर्मचारी बनला. 2014 मध्ये त्याची पदोन्नती होऊन तो कनिष्ठ लिपीक झाला. प्रत्येक कामात जीव ओतून काम करणारा कर्मचारी म्हणून त्याची ओळख निर्माण झाली.
अवघ्या सात वर्षांच्या सेवाकाळात त्याला तब्बल तीन वेळा “बेस्ट लिपीक” पुरस्कार मिळाला. महसूल विभागातील अत्यंत जबाबदारीचे आणि जोखमीचे मानले जाणारे निवडणूक विभागातील कामात त्याने विशेष प्रावीण्य मिळवले. सुट्ट्यांच्या दिवशीही कुरकूर न करता आनंदाने काम करणारा कर्मचारी म्हणून तो प्रसिद्ध झाला. मूल तहसिल मध्ये निवडणूक विषय म्हटलं की, अमोल करपे हे नाव लागूनच येते.
2023 मध्ये त्याची बदली सावली येथे झाली. मात्र त्याच्या कामाची गुणवत्ता आणि निष्ठा पाहून उपविभागीय अधिकारी यांनी त्याला पुन्हा मूल तहसिलला जोडून घेतले. हे त्याच्या कार्यक्षमतेचे मोठे प्रमाणपत्र होते.
विशेष बाब म्हणजे, चंद्रपूरमध्ये त्याच्यासोबत राहणारे पाचही रूम पार्टनर विविध पदांवर सरकारी सेवेत दाखल झाले. पण त्यांच्यात सर्वाधिक प्रेरणादायी प्रवास अमोलचा ठरला. कारण तो शिक्षण सोडून हॉटेलमध्ये काम करणारा युवक होता. परिस्थितीने त्याला शाळेबाहेर ढकलले होते, पण योग्य मित्र, योग्य मार्गदर्शन आणि स्वतःची जिद्द यामुळे त्याने पुन्हा शिक्षणाचा धागा पकडला आणि यशाचे शिखर गाठले.
शिक्षणाचे महत्व लक्षात घेवून, नौकरी करीत असतांनाच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठातून पदवी पर्यंतचे शिक्षणही त्यांनी पूर्ण केले.
आजही अमोल करपे अनेकदा सांगतात की, मित्रांना अभ्यास करताना पाहून “शाळा सोडून मी चूक केली का?” हा प्रश्न त्यांना सतावत असे. मात्र त्यांनी योग्य वेळी स्वतःमध्ये बदल केला. निर्णय घेतला. शिक्षणाकडे पुन्हा वळले. आणि तोच निर्णय त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
लवकरच अमोल करपे यांची सहाय्यक महसूल अधिकारी पदावर पदोन्नती होणार आहे. ही केवळ एका व्यक्तीची यशोगाथा नाही, तर संघर्ष करणाऱ्या प्रत्येक युवकासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे.
अमोल करपे यांची कहाणी एकच संदेश देते—
“परिस्थिती कितीही कठीण असली, शिक्षण आणि जिद्द यांची साथ असेल तर अपयशाचे दार बंद होत नाही. योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि सततची मेहनत आयुष्य बदलू शकते.”
आजचा अमोल करपे हा केवळ महसूल विभागातील यशस्वी कर्मचारी नाही, तर संघर्षातून उभे राहून स्वप्न पूर्ण करू पाहणाऱ्या असंख्य युवकांसाठी प्रेरणादायी आदर्श आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!