‘नवीन अभ्यासक्रमानुसार’ प्राथमिक शिक्षकांचे तीन दिवसीय प्रशिक्षण उत्साहात संपन्न

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : -  दि. २० : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमावर आधारित सुलभकांचे तीन दिवसीय प्रशिक्षण उत्साहात पार पडले. हे प्रशिक्षण जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे १८ ते २० जून दरम्यान आयोजित करण्यात आले होते.

प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेश रुद्रकार यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करत प्रशिक्षणाची सुरुवात केली. यावेळी नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांनी विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धती आत्मसात करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

या कार्यशाळेत सुलभक म्हणून मंगला बोपचे, पुरुषोत्तम झोडे आणि डॉ. चोपराम गडपायले यांनी प्रशिक्षणार्थींना नवीन अभ्यासक्रमातील विविध बारकावे, अध्यापन पद्धती आणि उपक्रमांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर विशेष भर देण्यात आला. कृतीयुक्त आणि आनंददायी शिक्षण, कला कार्यशिक्षण, भारतीय मूळ ज्ञान, HPC कार्ड, बालवाटिका, शालेय आरोग्य शिक्षण तसेच भाषा व गणित विषयातील अध्यापन कौशल्ये यावर सखोल चर्चा करण्यात आली.

प्रशिक्षणाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावी पद्धतीने करण्यात आले होते. यासाठी दोन कुलांचे आयोजन करण्यात आले असून प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावरील एकूण ७८ प्रशिक्षणार्थींनी सक्रिय सहभाग नोंदविला. प्रत्येक कुलामध्ये ३९ शिक्षकांचा समावेश होता.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना सक्षम, सर्जनशील आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी हे प्रशिक्षण शिक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!