पवनीत इयत्ता दुसरीच्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमावर तीन दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षण

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि. २३/०६/२०२६
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडारा तथा शिक्षण विभाग पंचायत समिती पवनी यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दुसरीच्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमावर आधारित तीन दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन डॉ. एल. डी. बलखंडे महाविद्यालय, पवनी येथे २२ ते २४ जूनदरम्यान उत्साहात करण्यात आले.

कार्यशाळेचे उद्घाटन पंचायत समिती पवनीचे गटशिक्षणाधिकारी संजयकुमार वासनिक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक लक्ष्मण लोथे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी आणि विलास सुखदेवे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी संजयकुमार वासनिक यांनी प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “बदलत्या शैक्षणिक प्रवाहानुसार शिक्षकांनी नवीन अध्यापन पद्धती, तंत्रज्ञान आणि कौशल्यांचा स्वीकार करणे आवश्यक आहे. प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरतेत गुणात्मक वाढ घडवून आणता येईल.”

या प्रशिक्षणात राज्य अभ्यासक्रम आराखडा (NCF), विद्यार्थ्यांचे समग्र प्रगती पुस्तक तसेच नवीन पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४-२६ या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विविध तज्ज्ञ सुलभकांनी शिक्षकांना नाविन्यपूर्ण अध्यापन तंत्र, कृतीआधारित शिक्षण आणि मूल्यमापन पद्धतींबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधनव्यक्ती मंजुषा दलाल यांनी केले. प्रास्ताविक डॉ. मुरलीधर रेहपाडे यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन विषयतज्ज्ञ महेंद्र वाहने यांनी केले.

हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी वीणा रंगारी, जनाबाई हेमने तसेच समग्र शिक्षा अभियानातील सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

या प्रशिक्षणात पवनी तालुक्यातील ११ केंद्रांमधील इयत्ता दुसरीचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!