मेसा टेकडीवर मोहरम सहावीला भाविकांची अलोट गर्दी
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - तालुक्यातील मेसा येथील प्रसिद्ध बाबा शेख फरीद दर्गा (टेकडी) येथे मोहरम सहावी निमित्त रविवारी (दि. २२ जून २०२६) हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली. इस्लाम धर्मातील नवीन वर्षाच्या प्रारंभी साजऱ्या होणाऱ्या मोहरम उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यासह बाहेरील भागातून विविध धर्मीय श्रद्धाळूंनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
भाविकांनी विधिवत पूजा-अर्चा करून बाबा शेख फरीद यांच्या दर्ग्याचे दर्शन घेत मनोभावे प्रार्थना केली. सकाळपासूनच मेसा टेकडी परिसरात भक्तांची गर्दी उसळली होती. दर्गा परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
उत्सवानिमित्त भाविकांकडून अर्पण करण्यात आलेल्या धान्य व साहित्याच्या माध्यमातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दर्गा परिसरात मोठा मंडप उभारून भाविकांसाठी भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विविध स्वयंसेवी संस्था तसेच गावकऱ्यांनी या व्यवस्थेत सक्रिय सहभाग घेतला.
मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने मेसा गावकरी, व्यापारी वर्ग तसेच शेगाव पोलीस स्टेशन यांच्या वतीने चोख नियोजन करण्यात आले होते. शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेसा मार्गावर विशेष पोलिस व्यवस्था ठेवण्यात आली होती.
या आयोजनासाठी बाबा फरीद दर्गा समिती, ग्रामपंचायत सदस्य, माठे कृषी केंद्राचे संचालक तसेच निलकंठ वरभे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले. धार्मिक सलोखा आणि श्रद्धेचे प्रतीक ठरलेल्या या उत्सवामुळे मेसा परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!