आजीची आजी अजूनही ठणठणीत! पाच पिढ्याची विस्मयकारक कहानी
पाच पिढ्यांचा अनोखा संगम; आजीची आजी आजही ठणठणीत, स्वतःची कामे स्वतः करणारी आजीबाई
राजुरा (प्रतिनिधी)
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक कुटुंबांमध्ये तीन पिढ्यांचा सहवासही दुर्मिळ होत चालला आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील एका कुटुंबात तब्बल पाच पिढ्या एकाच वेळी जिवंत असून एकत्र नात्यांचा अनमोल वारसा जपला जात आहे. विशेष म्हणजे पाचव्या पिढीतील १२ वर्षीय आयुष मेश्राम याची आजीची, आजी आजही वयाच्या ८८व्या वर्षी ठणठणीत असून स्वतःची कामे स्वतः करत आहे.
राजुरा येथील आयुष मेश्राम (वय १२ वर्षे) याच्या कुटुंबातील ही अनोखी कहाणी आहे. आयुषची आई भाविका मेश्राम (वय ३२ वर्षे), आजी माला पेंदोर (वय ४८ वर्षे), पणजी निरंजना मडावी (वय ६६ वर्षे, रा. कोंडेखल, ता. सावली) आणि पणजीची आई जाईबाई लहुजी वेलादी (वय ८८ वर्षे, रा. अड्याळ, ता. चामोर्शी) अशा पाच पिढ्या आजही जिवंत आहेत.
या कुटुंबातील सर्वात वयोवृद्ध जाईबाई लहुजी वेलादी यांनी आयुष्याची ८८ वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र वयाच्या या टप्प्यावरही त्यांचा उत्साह आणि आत्मनिर्भरता कौतुकास्पद आहे. त्या अजूनही दैनंदिन जीवनातील कामे स्वतः करतात आणि कुटुंबातील लहान-मोठ्यांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
आयुष मेश्रामला आपल्या पणजीचे प्रेम, आजीचे मार्गदर्शन आणि पाच पिढ्यांचा अनुभव एकाच वेळी मिळत आहे. बदलत्या काळात हरवत चाललेल्या संयुक्त कुटुंबाच्या संस्कृतीचे हे कुटुंब जिवंत उदाहरण आहे.
पाच पिढ्यांचा हा सहवास केवळ कौटुंबिक आनंदाचा विषय नसून नात्यांची घट्ट वीण, संस्कारांची परंपरा आणि दीर्घायुष्याचा सुंदर संदेश देणारी प्रेरणादायी कहाणी ठरत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!