उप कार्यकारी अभियंता संजय जळगावकर यांचा भावपूर्ण निरोप समारंभ संपन्न

कर्तव्यदक्ष सेवेला मानाचा मुजरा; सहकाऱ्यांनी व्यक्त केल्या आठवणी

शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )

चिमूर : - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) चिमूर कार्यालयात उप कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय व कर्मचारीवर्गामध्ये लोकप्रिय असलेले संजय जळगावकर यांचा भावपूर्ण निरोप समारंभ बुधवार, दिनांक १० जून २०२६ रोजी चिमूर येथील मिलन सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महावितरण कर्मचारी, अधिकारी व जाणमित्र यांच्या उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमात जळगावकर यांच्या सेवाकार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरोरा विभागाचे कार्यकारी अभियंता विलास नवघरे हे होते. यावेळी चिमूर येथे नव्याने उप कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झालेले प्रणव कुर्रेवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच देवेंद्र धंजोडे, विवेक माटे, मयूर बिनोने, सचिन बद्खल, बिसेन, टेम्भेकर, ठाकरे, नाईक, सुवर्णा जुगादे, कांबळे मॅडम यांच्यासह तालुक्यातील विविध शाखांचे शाखा अभियंते, अधिकारी, कर्मचारी आणि जाणमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्वागताने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संजय जळगावकर यांच्या कार्यपद्धती, नेतृत्वगुण, कर्मचाऱ्यांप्रती असलेली आत्मीयता तसेच ग्राहकाभिमुख सेवेमुळे त्यांनी विभागामध्ये निर्माण केलेल्या सकारात्मक कार्यसंस्कृतीचा गौरव केला. आपल्या सेवाकाळात त्यांनी वीज वितरण व्यवस्थेतील अनेक तांत्रिक व प्रशासकीय आव्हानांचा यशस्वीपणे सामना करत विभागाच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय योगदान दिल्याचे वक्त्यांनी नमूद केले.

वक्त्यांनी सांगितले की, जळगावकर यांनी नेहमीच ग्राहकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यावर भर दिला. ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय निर्माण करून संघभावनेने काम करण्याची प्रेरणा दिली. त्यामुळेच त्यांना अधिकारी व कर्मचारी वर्गात विशेष आदराचे स्थान प्राप्त झाले.

या प्रसंगी संजय जळगावकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अनेक सहकाऱ्यांनी त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देत भावनिक मनोगते व्यक्त केली. काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना मिळालेल्या अनुभवांची माहिती देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

नव्याने रुजू झालेले उप कार्यकारी अभियंता प्रणव कुर्रेवार यांनी आपल्या मनोगतात जळगावकर यांच्या कार्याचा आदर्श घेऊन विभागाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वास व्यक्त केला. तर अध्यक्षीय भाषणात कार्यकारी अभियंता विलास नवघरे यांनी जळगावकर यांच्या सेवाभावाचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

निरोपाला उत्तर देताना संजय जळगावकर यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव कथन केले. चिमूरमधील अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. "महावितरण ही केवळ संस्था नसून एक कुटुंब आहे. येथे मिळालेल्या प्रेम, आपुलकी आणि सहकार्याच्या आठवणी कायम स्मरणात राहतील," असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

या कार्यक्रमाचे आयोजन पवन अस्टनकर, कृपाल लांजे, सुमित दडमल, दत्ता चौधरी आणि चंदू मडकवार यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत सुरेख पद्धतीने करण्यात आले होते. उपस्थितांनी संजय जळगावकर यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत त्यांना निरोप दिला.

महावितरणच्या चिमूर विभागात कार्यरत असताना केलेल्या उल्लेखनीय सेवेमुळे संजय जळगावकर यांनी अधिकारी, कर्मचारी व ग्राहकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले असून त्यांचा हा निरोप समारंभ भावनिक आणि संस्मरणीय ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!