चिमूर बसस्थानकासमोर भीषण अपघात : बसच्या चाकाखाली येऊन भिक्षेकरी वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
बसस्थानक परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांकडून वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-ई वर गुरुवारी (दि. ४ जून) सायंकाळी सुमारे ६.३० वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका भिक्षेकरी वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून बसस्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीहून चिमूरकडे येणारी चिमूर आगाराची बस राष्ट्रीय महामार्गावरून बसस्थानकात प्रवेश करत होती. त्यावेळी रस्त्याच्या डाव्या बाजूने भाजीपाला घेऊन चालत असलेल्या एका वृद्ध महिलेला बसची धडक बसली. बसच्या पुढील चाकाखाली आल्याने महिला गंभीर जखमी झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच चिमूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे हलविण्यात आला. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिची माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.
वाहतूक कोंडीमुळे वाढतोय अपघातांचा धोका
चिमूर बसस्थानक परिसरात सध्या ३०० हून अधिक ई-रिक्षा, खाजगी प्रवासी वाहने, मिनी ट्रॅव्हल्स तसेच इतर वाहतूक साधने मोठ्या प्रमाणात उभी राहत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बसस्थानकासमोर नेहमीच वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, बसस्थानक परिसरात नियमितपणे वाहतूक पोलिसांची नियुक्ती करून वाहतूक सुरळीत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच अनधिकृत वाहन थांबे, ई-रिक्षांची अव्यवस्थित पार्किंग आणि खाजगी प्रवासी वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नागरिकांची मागणी
या दुर्दैवी घटनेनंतर बसस्थानक परिसरात कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रण यंत्रणा उभारावी, वाहतूक पोलिसांची नियमित नियुक्ती करावी तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
चिमूर बसस्थानकासमोरील हा अपघात केवळ एका महिलेचा बळी घेऊन थांबलेला नसून, परिसरातील वाहतूक व्यवस्थेतील गंभीर त्रुटी अधोरेखित करणारा ठरला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!