जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तथागत विद्यालय, केसलवाडा येथे वृक्षारोपण
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील अड्याळ केंद्रांतर्गत येणाऱ्या तथागत विद्यालय, केसलवाडा येथे शुक्रवार (दि. ५ जून) रोजी विद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना "निसर्गापासून प्रेरित हवामानासाठी आपल्या भविष्यासाठी" अशी असून पर्यावरण संरक्षण व संवर्धनाबाबत जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय संकटांच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणासारख्या उपक्रमांचे महत्त्व अधिक वाढले आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तसेच प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले. वृक्ष हे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून भावी पिढीसाठी सुरक्षित व निरोगी पृथ्वी निर्माण करण्यासाठी वृक्षसंवर्धन आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक पद्माकर सावरकर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष जयेंद्र चव्हाण, लिपिक बी. एम. गजभिये, परिचर देवानंद देशमुख, शंकर चंदन बावणे तसेच विद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!