चक्रीवादळात शेतकऱ्याची सौर जल उपसा प्रणाली कोसळली
नुकसानभरपाईसाठी कंपनीकडे मागणी; ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कारवाईची अपेक्षा
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील मौजा महालगाव काळू येथील शेतकरी बालाजी ढेकलूजी खवसे यांच्या शेतातील सौर जल उपसा प्रणाली चक्रीवादळाच्या तडाख्यात पूर्णपणे कोसळून मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शेती हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यापुढे गंभीर संकट उभे ठाकले असून संबंधित कंपनीने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी खवसे यांच्या सर्वे क्रमांक २३८ मधील शेतात शासनाच्या योजनेअंतर्गत बसविण्यात आलेली सौर जल उपसा प्रणाली कार्यरत होती. मात्र अलीकडे परिसरात आलेल्या तीव्र चक्रीवादळ व वादळी वाऱ्यांमुळे संपूर्ण यंत्रणा तुटून खाली पडली. लोखंडी संरचना, सोलर पॅनल, मोटार तसेच इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्याला बसल्याचे सांगितले जात आहे.
सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू असून नांगरणी, वखरणी, पेरणी आणि लागवडीची कामे वेगाने सुरू आहेत. अशा परिस्थितीत शेतीसाठी अत्यावश्यक असलेली पाणीपुरवठा व्यवस्था बंद पडल्याने पिकांच्या व्यवस्थापनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सिंचनासाठी पर्यायी साधन उपलब्ध नसल्याने शेतकऱ्याला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, संबंधित सौर प्रणाली बसविताना दर्जेदार साहित्य वापरणे, सुरक्षित फाउंडेशन करणे आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यास सक्षम रचना उभारणे ही कंपनीची जबाबदारी असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. जर यंत्रणेची उभारणी निकृष्ट दर्जाची अथवा तांत्रिक नियमांचे उल्लंघन करून करण्यात आली असेल, तर तो ग्राहकांची फसवणूक व सेवेत त्रुटीचा प्रकार मानला जाऊ शकतो, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नुसार कोणत्याही ग्राहकाला निकृष्ट सेवा, दोषपूर्ण साहित्य किंवा निष्काळजीपणामुळे आर्थिक नुकसान झाल्यास संबंधित कंपनीकडे नुकसानभरपाई मागण्याचा अधिकार आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये विमा संरक्षण, हमी अटी किंवा देखभाल करार लागू असल्यास कंपनीने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मदत करणे आवश्यक असल्याचेही सांगितले जात आहे.
स्थानिक शेतकरी व नागरिकांनी प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल तयार करावा, तसेच संबंधित कंपनीवर जबाबदारी निश्चित करून शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत व नवीन सौर यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील सौर प्रकल्पांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून भविष्यात अशा यंत्रणांच्या उभारणीत मजबूत तांत्रिक निकष व नियमित तपासणीची आवश्यकता असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!