पवनी तालुक्यातील आसगाव येथे सार्वजनिक ग्रंथालयाच्या दुरुस्तीमध्ये लाखोंच्या भ्रष्टाचाराचा आरोप
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - आसगाव गावातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या दुरुस्ती कामामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारातून माहिती मागविल्यानंतर या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरातील समाज मंदिराची इमारत सार्वजनिक ग्रंथालयासाठी देण्यात आली होती. या ग्रंथालयाच्या दुरुस्ती, पेंटिंग व इतर कामांसाठी मोठ्या रकमेचे इस्टिमेट तयार करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अनेक कामे न करता किंवा अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे करून पूर्ण बिलांची उचल करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात प्रभारी सरपंच महेश आनंदराव फुंडे तसेच ग्रामपंचायत सचिव हटवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, लाखो रुपयांचा निधी दुरुस्तीच्या नावाखाली खर्च दाखवून संबंधितांनी आर्थिक अपहार केला आहे.
सार्वजनिक ग्रंथालय ही गावातील विद्यार्थ्यांसाठी, स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या युवकांसाठी तसेच वाचन संस्कृती जपणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची शैक्षणिक संस्था मानली जाते. अशा सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या विकासासाठी आलेल्या निधीत भ्रष्टाचार झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रभारी सरपंचाला तात्काळ निलंबित करून आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून माहितीच्या अधिकारातून आणखी अनेक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!