सागरा स्मशानभूमी रोडवर युवकाचा संशयास्पद मृतदेह; घात की अपघात? जुगार अड्ड्याशी कनेक्शनची चर्चा
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
भद्रावती : - भद्रावती तालुक्यातील सागरा गावाजवळ स्मशानभूमीच्या रस्त्यालगत 38 वर्षीय युवकाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत युवकाचे नाव प्रशांत पंढरी चौधरी (रा. बोरगाव धांडे) असून तो सागरा येथे नेमका कशासाठी आला होता, याबाबत अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, निर्जन मशानभूमी रोडवर हा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच शेगाव (बु.) पोलीस स्टेशनला कळविण्यात आली. ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
घटनास्थळी मृतकाची बाईक रस्त्याच्या कडेला उभी आढळली. मात्र त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा घात आहे की अपघात, याबाबतचा नेमका उलगडा पोस्टमार्टम अहवालानंतरच होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान, सागरा परिसरातील वखार महामंडळाच्या गोडाऊनजवळ रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात असल्याची चर्चा आहे. वरोरा व आजूबाजूच्या गावांमधून अनेक जण येथे जुगारासाठी येतात, अशी माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. त्यामुळे या जुगार अड्ड्याचा आणि युवकाच्या मृत्यूचा काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे.
मृतक प्रशांत चौधरी हा मनमिळाऊ स्वभावाचा असल्याचे ग्रामस्थ सांगतात. मात्र या घटनेनंतर गावात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, “घात की अपघात?” यावर जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास शेगाव (बु.) पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!