वीजेचा भीषण प्रहार; गुरे बांधण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

खापरी गावावर शोककळा; रणभिड रामजी रामटेके यांचा दुर्दैवी अंत

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चिमूर तालुक्यातील डोमा परिसरालगत असलेल्या खापरी गावात शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका शेतकऱ्याचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गुरे बांधण्यासाठी गोठ्याकडे जात असताना अचानक आकाशातून कोसळलेल्या विजेच्या प्रहाराने रणभिड रामजी रामटेके (वय ५० वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे ४ वाजताच्या दरम्यान खापरी परिसरात जोरदार वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. याच दरम्यान रणभिड रामजी रामटेके हे आपल्या गुरांची व्यवस्था करण्यासाठी गोठ्याकडे जात होते. अचानक आकाशात कडकडाट झाला आणि काही क्षणातच त्यांच्या जवळ वीज कोसळली. विजेचा प्रहार इतका तीव्र होता की त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. काही क्षणांपूर्वी आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असलेले रणभिड रामटेके यांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने खापरी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमली होती. अनेकांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महसूल व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.

रणभिड रामटेके हे कुटुंबातील कर्ते पुरुष असल्याने त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले व आप्तस्वकीय असा परिवार असून गावातील सामाजिक व कौटुंबिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.

सध्या मान्सूनपूर्व काळात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी विशेषतः मोकळ्या जागेत, झाडाखाली अथवा शेतात काम करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे खापरी गावावर शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांप्रती सर्व स्तरातून संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!