पवनी शहरातील राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेसाठी विदर्भ युवा क्रांती संघटनेचे नगराध्यक्षाना निवेदन

प्रत्येक चौकात सीसीटीव्ही, स्पीड ब्रेकर आणि प्रवाशांसाठी टिनशेड  उभारण्याची मागणी

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - पवनी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, शहरातील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, अपघातप्रवण ठिकाणी स्पीड ब्रेकर उभारणे तसेच प्रवासी आणि विद्यार्थ्यांसाठी टिनशेड निवारा केंद्रांची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी विदर्भ युवा क्रांती संघटनेच्या वतीने नगराध्यक्ष मॅडम यांना करण्यात आली आहे.

दि. १५ जून २०२६ रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पवनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांना निवेदन सादर करून शहरातील वाहतूक सुरक्षेबाबत विविध मागण्या मांडल्या. निवेदनात नमूद करण्यात आले की, राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता शहरातील अनेक चौक अपघातप्रवण बनले आहेत. त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारी घटनांवर अंकुश आणण्यासाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे काळाची गरज बनली आहे.

तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या चौकांमध्ये व वर्दळीच्या भागात स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी करण्यात आली. अनेकदा भरधाव वाहनांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत असल्याची बाबही निवेदनातून अधोरेखित करण्यात आली.

याशिवाय, बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवासी व विद्यार्थ्यांना उन्हाळा, पावसाळा आणि इतर प्रतिकूल हवामानाचा त्रास सहन करावा लागत असल्याने राष्ट्रीय महामार्गालगत प्रमुख ठिकाणी टिनशेड निवारा केंद्र उभारण्यात यावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळणार असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

निवेदन सादर करताना विदर्भ युवा क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपकसिंग टाक, तालुकाध्यक्ष संतोषभाऊ वाघमारे, शहराध्यक्ष रणवीरसिंग बावरी यांच्यासह गणेशभाऊ भिवगडे, अतुलभाऊ सोमनाथे, आर्यन शेंडे, मोहित मेश्राम, अनिकेत आणि संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या मागण्यांची नगरपरिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!