शटर फोडून आत शिरला 'महाकाय पाहुणा'; मूल तालुक्यात खळबळ
मूल तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ; शेतातील गोडाऊनची तोडफोड
मूल : तालुक्यात हत्तींच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रविवारी रात्री हत्तींच्या कळपाने एका शेतातील गोडाऊनमध्ये घुसून मोठी नासधूस केली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत कावळे यांच्या शेतातील गोडाऊन श्री. सारडा यांनी भाडेतत्त्वावर घेतले आहे. या गोडाऊनवर हत्तींच्या कळपाने हल्ला चढवत शटर, खिडक्या तसेच इतर साहित्याचे नुकसान केले. घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
सध्या मूल तालुक्यात हत्तींचा वावर वाढला असून विविध भागांत ते अन्नाच्या शोधात फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतपिके, घरांसह आता गोडाऊन आणि इतर मालमत्तांनाही धोका निर्माण झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वन विभागालाही याबाबत कळविण्यात आले असून नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, शेतीच्या कामांचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतात वावरत आहेत. अशा परिस्थितीत हत्ती आणि मानव यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता वाढली असून वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
हत्तींच्या वाढत्या हालचालींमुळे मूल तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!