कडक उन्हाळ्यात चिमूर शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या

५८ कोटींची नळ योजना फक्त कागदावरच ? नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात सध्या कडक उन्हाळ्यामुळे तापमान तब्बल ४७ डिग्री सेलसियसपर्यंत पोहोचले असून नागरिकांचे जीवन अक्षरशः हैराण झाले आहे. अशा भीषण उष्णतेत चिमूर शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये पिण्याच्या पाण्याची अत्यंत बिकट समस्या निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
शहरासाठी मंजूर करण्यात आलेली तब्बल ५८ कोटी रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना अनेक वर्षांपासून केवळ कागदावरच असल्याचे चित्र नागरिकांसमोर उभे राहत आहे. शासनाकडून मोठा निधी मंजूर होऊन देखील नागरिकांना नियमित व पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रभागात काही ठिकाणी नळाची पाईपलाईन टाकण्यात आली नसली व असली तरी दिवसा पाणीपुरवठा होणे अपेक्षित असताना रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यानच नळाला पाणी सोडले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. रात्रीच्या वेळी अनेक नागरिक मोटार पंपाद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी खेचत असल्याने इतर सामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. अनेक कुटुंबांना पिण्यासाठी एक घागर पाणी देखील मिळत नसल्याने महिलांची मोठी परवड होत आहे.

या गंभीर समस्येबाबत स्थानिक नगर सेवक व नगर सेविकांकडे वारंवार तोंडी तक्रारी करण्यात आल्या. मात्र जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून उडवा-उडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही लोकप्रतिनिधी नागरिकांसमोर उर्वट भूमिका घेत असल्याने स्थानिक महिला व पुरुषांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“पाण्याविना जीवन जगणे कठीण झाले असून घरगुती कामकाज, पिण्याचे पाणी व उदरनिर्वाह कसा करावा?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांकडून देण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!