राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरील खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त
अपघातात अनेकांना गमवावा लागला जीव
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - प्रादेशिक परिवहन विभाग नागरिकांकडून वाहन कर आणि विविध शुल्कांची सक्तीने वसुली करत असताना दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग ३५३ ईची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. या महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सदर महामार्गावरून दररोज शेकडो लहान-मोठी वाहने प्रवास करतात. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत असून अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या महामार्गावर यापूर्वीही अनेक भीषण अपघात झाले असून अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही अपघातांमध्ये तर कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने संबंधित कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे. तरीदेखील संबंधित प्रशासनाकडून या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
पोलीस प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी वारंवार होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. वाहनधारकांकडून नियमांच्या नावाखाली दंड आणि कर वसूल करणारे प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेबाबत मात्र उदासीन असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विशेष म्हणजे प्रादेशिक परिवहन विभाग दैनंदिन “रस्ता सुरक्षा अभियान” राबवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करत असते. हेल्मेट वापरा, सीट बेल्ट लावा, वाहतूक नियमांचे पालन करा अशा विविध माध्यमांतून वाहनचालकांना सुरक्षिततेचे धडे दिले जातात. मात्र प्रत्यक्षात रस्ते आणि महामार्गांची अवस्था अत्यंत बिकट असून प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
महामार्ग सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पाहता आवश्यक त्या प्रमाणात कोणतीही प्रभावी सुरक्षा व्यवस्था दिसून येत नाही. अनेक ठिकाणी सूचना फलक नाहीत, रस्त्यावरील रिफ्लेक्टर तुटलेले आहेत, रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्थेचा अभाव आहे तसेच धोकादायक वळणांवरही कोणतीही ठोस खबरदारी घेतलेली दिसत नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणजे चिमूर-वरोरा राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई, जिथे दररोज वाहनचालक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.
विशेषतः वरोरा येथील पॉलीटेकनिक कॉलेज परिसरात रस्त्यावर मोठा खड्डा निर्माण झाला असून त्या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. विद्यार्थ्यांची तसेच दुचाकीस्वारांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या या भागात प्रशासनाने अद्याप कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच बामनडोह आणि चारगाव नाल्याजवळही रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या भागातून अवजड वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. परिणामी वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने परिस्थिती आणखी धोकादायक बनत आहे.
स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस दुरुस्ती करण्यात आलेली नाही. नागरिकांचा प्रश्न आहे की, वाहनधारकांकडून वेळोवेळी कर व दंड वसूल करणाऱ्या प्रशासनाने रस्त्यांच्या दुरुस्तीकडेही तितकेच गांभीर्याने लक्ष द्यावे.
वाहनचालकांनी संबंधित विभागाकडे तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून खड्डेमुक्त महामार्ग करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!