पवनी येथील शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार; रुग्ण व नातेवाईकांमध्ये संताप
भर दिवसा मोकाट कुत्र्यांचा रुग्णालयात संचार
तालूका - प्रतिनिधि ( शेखर जिभकाटे )
पवनी : -दिनांक १९ मे २०२६ भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला असून, अपघातग्रस्त रुग्णाला योग्य उपचार न मिळाल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. अपघात झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असता, तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी तत्काळ उपचार करण्याऐवजी उद्धटपणे वागणूक दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.
रुग्णाची प्रकृती गंभीर असतानाही डॉक्टरांकडून प्राथमिक तपासणी न करता उलटसुलट प्रश्न विचारण्यात आले. “तुम्ही कुठे राहता?”, “काय व्यवसाय करता?” अशा प्रश्नांमध्ये वेळ घालवण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. इतकेच नव्हे तर, रुग्णाला घेऊन आलेल्या नागरिकांशी वाद घालत त्यांचे मोबाईलवर व्हिडिओ बनविण्याचा प्रकारही घडल्याचे समोर आले आहे.
यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, “गोरगरीब जनतेने उपचारासाठी नेमके कुठे जायचे?” असा सवाल उपस्थित होत आहे. शासकीय रुग्णालय हे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यसेवेसाठी असते, मात्र पवनी येथील रुग्णालयात रुग्णांशी अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, रुग्णालय परिसरात भर दिवसा कुत्र्यांचा मुक्त वावर दिसून येत असल्याने स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. “हे रुग्णालय माणसांसाठी आहे की जनावरांसाठी?” असा संतप्त सवाल पवनीकर नागरिकांनी उपस्थित केला आहे.
स्थानिकांच्या मते, रुग्णालयात डॉक्टर, नर्स व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच दोषींना निलंबित करण्यात यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!