गॅससाठी रांगा, त्रस्त नागरिक… आणि अचानक सुरू झाला डिजिटल उपाय!

मूल शहरात सोशल मीडियाची ताकद; नागरिकांच्या समस्यांवर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा प्रभावी उपाय


मूल : सोशल मीडिया चांगला की वाईट यावर नेहमीच चर्चा रंगत असते. मात्र त्याचा योग्य आणि प्रभावी वापर केल्यास तो सामान्य जनतेच्या हितासाठी किती उपयुक्त ठरू शकतो, याचे उत्कृष्ट उदाहरण मूल शहरात पाहायला मिळत आहे.
अलीकडे मध्यपूर्व आशियातील इराण आणि अमेरिकेमधील तणावामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आणि त्याची झळ मूल शहरालाही बसली. गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सिलेंडर कधी येणार, कुठे उपलब्ध होणार, किती प्रमाणात मिळणार आणि कोणाला मिळणार, अशा अनेक प्रश्नांनी नागरिक त्रस्त झाले होते.
या परिस्थितीत मूल शहरातील “समस्या मूल शहराच्या” आणि “आपली समस्या आपले समाधान” या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सने पुढाकार घेत नागरिकांना मोठा दिलासा दिला. या ग्रुपच्या माध्यमातून गॅस संबंधित सर्व माहिती वेळोवेळी नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली.
प्रा. सुधीर नागोसे, मोती टहलीयांनी तसेच ग्रुप ॲडमिन प्रा. संजय येरोजवार यांनी स्वतः मैदानात उतरून नागरिकांना मदत केली. त्यांनी गॅस एजन्सी आणि ग्राहक यांच्यात दुवा साधत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक नागरिकांना वेळेवर गॅस सिलेंडर मिळण्यास मदत झाली.
फक्त गॅसपुरवठ्यापुरतेच मर्यादित न राहता, या ग्रुप्समध्ये शहरातील इतर नागरी समस्यांवरही सक्रियपणे चर्चा केली जाते. वीजपुरवठा खंडित होणे, सार्वजनिक ठिकाणी दिवे नसणे, नाले व रस्त्यांची साफसफाई, तसेच पिण्याच्या पाण्याच्या समस्या यांसारख्या मुद्द्यांवरही नागरिक आपले प्रश्न मांडतात आणि संबंधित विभागांकडून त्यावर उपाययोजना केली जाते.
मूल शहरातील या उपक्रमामुळे सोशल मीडियाचा सकारात्मक वापर कसा करता येतो आणि त्यातून समाजहिताचे मोठे काम कसे घडू शकते, याचा आदर्श निर्माण झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!